बहुजननामा ऑनलाईन – महाराष्ट्राची राजधानी मुंबईतील महिलांनी साऱ्या देशासमोर एक सामाजिक- धार्मिक सलोख्याचा आदर्श सगळ्या समोर ठेवणारी घटना घडली आहे. मालाडमधील एका सोसायटीतील महिलांनी त्यांच्या मुलांना सर्वधर्म समभावाची शिकवण देणे, सर्व धर्माचा आदर करणे, तसेच मुलांना संवेदनशील बनवण्याचा निर्धार केला आहे.
मालाड मधील रॉयल ओएसिस सोसायटीच्या एका मैदानात एक सहा वर्षांची मुलगी अन्य मित्रांसोबत खेळायला गेली असता त्यातील दोन मुलांनी त्या मुलीसोबत खेळण्यास नकार दिला. कारण ती मुलगी मुस्लिम असल्याने त्यांनी तिच्या सोबत खेळण्यास नकार दिला होता. या घटनेनंतर ती चिमुकली रडत रडत घरी परतली आणि याबाबतची सर्व घटना आई- वडिलांना सांगितली. यानंतर मुलीच्या आईने सोसायटीच्या व्हॉट्सअॅप ग्रुपवर सगळा प्रसंग सांगितला आणि त्यावर चर्चा केली.
त्यानंतर सोसायटीमधील महिलांच्या एका गटांनी मुलीच्या कुटुंबियांना भेट दिली आणि त्यांना पाठिंबा दिला. सोसायटीतील वातावरणच या घटनेनंतर बदलून गेले. या घटनेनंतर सोसायटीतील लोकांनी सहमतीने काही निर्णय घेतला. मुलांमध्ये सर्व धर्म समानता ही भावना आणण्यासाठी यापुढे सर्व धर्मियांचे सण – उत्सव सामुहिकरित्या साजरे करण्यात येतील, असा निर्णय घेण्यात आला. तसेच सोसायटीत गेट-टुगेदर आणि डिनरचे आयोजनही करण्याचा प्रयत्न करण्यात आले. महिलांच्या बैठकीत पाल्यांना सर्व धर्म समभाव आणि सर्व धर्मियांचा सन्मान करण्याची शिकवण देण्याचा तसेच त्यांच्यात संवेदनशीलता विकसित करण्याचा प्रयत्न पालकांनी करावा असा संदेश हि देण्यात आला.