Mumbai-Pune News Railway Line | आता लोणावळ्याशिवाय मुंबई-पुणे असा प्रवास करता येणार; रेल्वेकडून प्रस्ताव तयार

पुणे: Mumbai-Pune News Railway Line | मुंबई-पुणे प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी महत्वाची माहिती समोर आली आहे. आता मुंबई-पुणे प्रवास हा लोणावळा वगळता करता येणार आहे. मुंबई-पुणे रेल्वे मार्गात लोणावळा-खंडाळा घाट आहे.
प्रवासी सुरक्षिततेमुळे ताशी ६० किमी वेगमर्यादा मेल-एक्स्प्रेसला आहे. नव्या मार्गावर घाट नसल्याने रेल्वेगाड्या ताशी ११० किमी वेगाने धावू शकणार आहेत. रेल्वे विभागाकडून त्याबाबतचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे.
मुंबई आणि पुणे दरम्यानचा रेल्वे प्रवास वेगवान आणि आरामदायी होण्यासाठी मध्य रेल्वेने चाकोरी बाहेरील उपायांवर काम सुरू केले आहे. कर्जत ते तळेगाव ७२ किमी आणि कर्जत ते कामशेत ६२ किमी हे दोन नवे रेल्वे मार्ग तयार करण्याचा मध्य रेल्वेचा प्रस्ताव आहे.
नव्या मार्गामुळे लोणावळा टाळून रेल्वे प्रवाशांना पुणे गाठता येणार आहे. नव्या मार्गावर मेल-एक्स्प्रेसचा वेग दुप्पट होईल, शिवाय नव्या १० रेल्वेगाड्या चालवण्याचा पर्यायही खुला होणार आहे.
दोन्ही मार्गांचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. यापैकी एक मार्ग मंजूर झाल्यावर त्याचे काम सुरू करण्यात येईल, असे रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले. प्रकल्पाचे प्रत्यक्ष काम सुरू झाल्यानंतर चार वर्षांत प्रकल्प पूर्ण होईल. कर्जत ते तळेगाव नव्या मार्गासाठी १६,००० कोटी आणि कर्जत ते कामशेत नव्या रेल्वे प्रकल्पासाठी १०,२०० कोटींचा खर्च अपेक्षित आहे.
रेल्वे विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, कर्जत ते तळेगाव दरम्यान ७२ किमीच्या नव्या मार्गावर घाटातील ग्रेडियंट (चढ-उताराची तीव्रता) १.१०० होणार आहे. सध्या लोणावळा घाटात १.३७ ग्रेडिएंट होणार आहे. यामुळे अतिरिक्त इंजिन जोडण्याची गरज भासणार नाही.
कर्जत ते तळेगाव अंतर ५७ किमी असून, नव्या मार्गात अंतर ७२ किमीपर्यंत पोहोचेल, कर्जत ते कामशेत दरम्यान सध्या ४४ किमी असून, नव्या मार्गानुसार ६२ किमी असणार आहे. घाटाऐवजी पर्वतरांगांना वळसा घालावा लागणार असल्याने नव्या मार्गात अंतर अधिक असणार आहे.
लोणावळा-खंडाळा घाटावर जाण्यापूर्वी आणि घाट उतरल्यानंतर कर्जत स्थानकात बॅंकरची (अतिरिक्त इंजिन) आवश्यकता भासते. बँकर हाताळण्यासाठी किमान १५-२० मिनिटांचा वेळ लागतो. नव्या मार्गावर घाट नसल्याने हा वेळ वाचणार असून यामुळे प्रवाशांच्या प्रवास वेळेतही घट होणार आहे, असे प्रस्तावात स्पष्ट केले आहे.
Comments are closed.