मुंबई : बहुजननामा ऑनलाइन – देश – विदेशातील पर्यटक सहभागी होत असलेल्या मुंबई मॅरेथॉनदरम्यान आज एका 64 वर्षीय व्यक्तीचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. त्यांचे नाव गजानन माळजळकर असे आहे. आज पहाटे या मॅरेथॉन स्पर्धेला सुरूवात झाली. त्यानंतर थोड्याच वेळाने हा प्रकार घडला. विशेष म्हणजे मॅरेथॉन स्पर्धेत धावताना माळजळकर यांच्यासह 8 जणांना हृदयविकाराचा झटका आला. यापैकी सात जणांवर रूग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत, अशी माहिती रूग्णालय प्रशासनाने दिली.
मुंबई मॅरेथॉनमध्ये नेहमीप्रमाणे देश – विदेशातील व्यावसायिक धावपटूंसह हजारो हौशी धावपटू तसेच मुंबईकर अबालवृद्ध सहभागी झाले होते. यावेळी मॅरेथॉन मध्ये धावत असताना सुमारे 4 किलो मीटरचे अंतर धावल्यानंतर गजानन माळजळकर या 64 वर्षांच्या व्यक्तीला हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने ते खाली कोसळले. त्यांना उपचारासाठी बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. तेथील डॉक्टरांनी माळजळकर यांना मृत घोषित केले. दरम्यान, मॅरेथॉनमध्ये सहभागी झालेल्या आणखी सात जणांना धावताना हृदयविकाराचा झटका आला आहे. उपचारासाठी त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. हिमांशू ठक्कर (47), लोयर्ड (38), सागर पाटील (33), राधा सिंग (38), सहाना आचार्य (42), समीर निरगवडे (43), हर्ष मेहता(54) अशी त्यांची नावे असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. धावण्याच्या वेळी या सातजणांना हृदयविकाराचा झटका आला असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिल्याचे, एका इंग्रजी संकेतस्थळाने दिली आहे.
दरम्यान, आशिया खंडातील सर्वात श्रीमंत मॅरेथॉन समजल्या जाणार्या या मॅरेथॉन स्पर्धेचे हे 17 वर्षे आहे. यातील मुख्य स्पर्धेत इथिओपिआचा हेरारा हरीसा हा विजेता ठरला. यंदाही स्पर्धेवर इथिओपिआच्या धावपटूंचे वर्चस्व दिसून आले. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून या मॅरेथॉनला सुरुवात झाली. तर वरळी डेअरी येथून अर्धमॅरेथॉनला सुरुवात झाली. मॅरेथॉनमध्ये सुमारे 55, 322 धावपटूंनी सहभाग घेतला होता. 9660 मुख्य मॅरेथॉन आणि 15 हजार 260 धावपटू अर्धमॅरेथॉनमध्ये सहभागी झाले होते. त्याचप्रमाणे, खुली 10 किमी रन (8032), ड्रीम रन (19707), वरिष्ठ नागरिक रन (1022), दिव्यांग (1596) व पोलीस कप (45 संघ) अशा इतर गटांमध्येही सहभागी झाले होते.