मुंबई : बहुजननामा ऑनलाईन- महाराष्ट्रातील मराठी माणसं मराठी शिका असे सांगतात मात्र त्यांची मुलेच इंग्रजी भाषेत शिकतात हे चित्र बदलण्यासाठी आणि मराठी भाषेची सातत्याने होणारी अवहेलना लक्षात घेऊन ‘मराठी भाषेला चांगले दिवस येण्यासाठी मराठीच्या भल्यासाठी व्यासपीठा’ची निर्मिती करण्यात आली.या व्यासपीठांतर्गत आज (सोमवार) आझाद मैदानावर आंदोलन छेडले जाणार आहे.या आंदोलनात राज्यभरातील २४ साहित्य-संस्कृतीविषयक संस्थांचे प्रतिनिधी, शिक्षक-प्राध्यापक संघटना, साहित्यिक, विचारवंत आणि अभ्यासक आदी सहभागी होणार आहेत.
आज होणाऱ्या या धरणे आंदोलनासाठी १३ जणांचे शिष्टमंडळ मराठीच्या भल्यासाठी व्यासपीठाचे अध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक मधू मंगेश कर्णिक यांच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटणार असल्याची माहिती व्यासपीठाचे प्रमुख कार्यवाह चंद्रशेखर गोखले यांनी दिली.यापूर्वीच प्रलंबित मागण्यांचे निवेदन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले आहे. या आंदोलनात नागनाथ कोतापल्ले, मधू मंगेश कर्णिक, डॉ. लक्ष्मीकांत देशमुख, डॉ. दीपक पवार, दिनकर गांगल, वर्षा उसगांवकर, अरुण नलावडे, प्रमोद पवार आदी मान्यवर सहभागी होणार आहेत.
काय आहेत मागण्या :
मराठी शिक्षण कायदा करणे
मराठी शाळांचे सक्षमीकरण,
शालेय ग्रंथालय समृद्ध करणे
मुंबईत मराठी भाषा भवन स्थापन करणे
मराठी शाळांचा प्रलंबित बृहद्आराखडा लागू करणे
मराठीला अभिजात भाषा गृहीत धरून निधीची तरतूद करणे