बहुजननामा ऑनलाइन टीम – राष्ट्रवादीचे नेते आणि सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडेंवर बलात्काराचा आरोप झाल्यानंतर मुंबईचे सहपोलीस आयुक्त विश्वास नांगरे- पाटील थेट राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांच्या भेटीला सिल्व्हर ओकवर दाखल झाले असून त्यांनी पवारांशी चर्चा केली आहे. या भेटीमुळे राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. नांगरे-पाटील हे कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून परिचीत असून गुन्हेगारी पार्श्वभूमीचे कोणतेही कठीण प्रकरण सोडवण्यात त्यांचा हातखंडा आहे. त्यामुळे ते या प्रकरणाची गुंतागुंत कशी सोडवतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
शरद पवारांच्या सिल्व्हर ओक निवासस्थानी भेट दिल्यानंतर आता विश्वास नांगरे -पाटील थेट मुख्यमंत्र्यांच्या भेटीला पोहोचलेत. नांगरे पाटील सह्याद्री अतिथिगृहावर मुख्यमंत्र्यांची भेट घेणार असून, मुंडेंवरच्या बलात्काराच्या आरोपांनंतर या प्रकरणाला महत्त्व प्राप्त झाले आहे.
महापौर किशोरी पेडणेकरांनी केला नांगरे पाटलांना कॉल
गेल्या काही दिवसांपूर्वी मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनासुद्धा धमकीचा फोन आला होता. त्यानंतर त्यांनी थेट विश्वास नांगरे पाटलांना कॉल केला होता. त्यावेळीही नांगरे पाटलांच्या मार्गदर्शनात पोलिसांनी संबंधित आरोपीला 24 तासाच्या आत बेड्या ठोकल्या होत्या. आता मुंडे प्रकरणातही नांगरे पाटील मैदानात उतरल्याने ते हे प्रकरण कशा पद्धतीने सोडवतात हे लवकरच समजणार आहे.