ठाणे बहुजननामा : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना ईडीने नोटीस पाठविल्याने तणावातून ठाण्यातील एका मनसे सैनिकाने पेटवून घेत आत्महत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. प्रवीण चौगुले असे या मनसे सैनिकाचे नाव आहे. मात्र, त्याला पोलिसांनी अद्याप दुजोरा दिलेला नाही.
प्रवीण चौगुले हा ठाण्यातील विटावा परिसरात रहात होता. राज ठाकरे यांना ईडीने नोटीस पाठविल्यानंतर प्रवीणने ईडीविरोधात सोशल मिडियावर अनेक पोस्ट केल्या होत्या. याबाबत मनसेच्या कार्यकर्त्यांनी सांगितले की, राज ठाकरे यांना नोटीस आल्याने आपण टेन्शनमध्ये असल्याचे तो म्हणाला होता. आपण काहीतरी भयंकर पाऊल उचलणार असल्याचे तो मित्रांना म्हणत होता. तेव्हा त्याला मित्रांनी असे काही न करण्यास सांगितले होते. त्यानंतर मंगळवारी रात्री प्रवीण याने स्वत:ला पेटवून घेऊन आत्महत्या केली.
राज ठाकरे यांना मिळालेल्या नोटीसीमुळेच तणावातून प्रवीण चौगुले यांनी आत्महत्या केल्याचा दावा मनसे कार्यकर्ते करीत आहेत. मात्र, पोलसांनी त्याला दुजोरा दिलेला नाही. आत्महत्या करण्यामागील नेमके कारण अद्याप समजले नसल्याचे पोलिसांनी सांगितले.