बहुजननामा ऑनलाईन
राज्या कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील शाळा, महाविद्यालये बंद आहे. विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये यासाठी ऑनलाईन शिक्षण दिले जात आहे. याच दरम्यान एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आला. ऑनलाईन क्लास सुरु असताना एका शिक्षकाने विद्यार्थिनीला अश्लील फोटो पाठवले. हा प्रकार मुंबईतील सांताक्रुझ पोलीस ठाण्याच्या परिसरात घडला आहे. पोलिसांनी संबंधित शिक्षकाला बेड्या ठोकल्या आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित शिक्षकाला गुरुवारी अटक करण्यात आली आहे. ऑनलाइन क्लास सुरु असताना त्याने एका विद्यार्थिनीच्या मोबाइलवर अश्लील स्टिकर पाठवल्याचा आरोप त्याच्यावर आहे. या शिक्षकाने दोनदा हे कृत्य केले. त्यानंतर विद्यार्थिनीने हे स्टिकर आपल्या पालकांना दाखवले. पालकांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी संबंधित शिक्षकाविरोधात गुन्हा दाखल करुन अटक केली.
पोलिसांनी सांगितले की, हा प्रकार 6 आणि 7 सप्टेंबर रोजी घडला आहे. 6 सप्टेंबरला शिक्षकाने विद्यार्थिनीच्या मोबाइलवर अश्लील स्टिकर पाठवले. एकूण तीन स्टिकर पाठवले. मात्र, त्यानंतर लगेच डिलिट केले. दुसऱ्या दिवशी पुन्हा एकदा त्याने स्टिकर पाठवले. विद्यार्थिनीने आपल्या पालकांना हा प्रकार सांगितल्यानंतर संतापलेल्या पालकांनी शिक्षका विरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली.
पोलिसांनी आरोपी शिक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल करुन अटक केली. त्यानंतर त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने 14 सप्टेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. संबंधित शिक्षकाने आणखी किती विद्यार्थ्यांना अशा प्रकारे अश्लिल स्टिकर पाठवले आहेत, याचा तपास केला जात आहे. तो ज्या विद्यार्थ्यांना शिकवत होता त्या सर्व विद्यार्थ्यांकडे चौकशी केली जात असल्याची माहिती पोलिसांनी दिली. संबंधित शिक्षकावर पॉक्सोअन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.