Mumbai Crime News | विधवेशी मॅरेज ब्युरोवरून ओळख वाढवली, लग्न करून विश्वास संपादन केला, गुंगीचं औषध देत 17 लाखांचा मुद्देमाल घेऊन पसार

मुंबई: Mumbai Crime News | दिंडोशीतील एक ५० वर्षीय महिलेची २८ वर्षांची मुलगी आहे. त्या मुलीचे लग्न ठरल्यानंतर आपली विधवा आई घरी एकटीच पडणार ही चिंता तिला सतावत होती. त्यानंतर तिने अनेक मॅरेज ब्युरोंवर तिच्या आईचे नाव नोंदवले. त्याचवेळी त्यांना अपेक्षित असलेला वरही मिळाला. प्रदीप नाईक असे त्याचे नाव होते. दोघेही एकमेकांना भेटले, पुढे संवादही होत गेला.
या दरम्यान प्रदीप नाईक यांने तिच्या पत्नीचे आणि मुलीचे कोविड काळात निधन झाल्याची माहिती दिली. नंतर त्या विधवा महिलेला विश्वास संपादन केला आणि त्यांनी लग्न केले. मात्र मॅरेज ब्युरोवरून ओळख झालेला व्यक्ती हा मोठा ठग निघाला. लग्न झाल्यानंतर त्याने महिलेची फसवणूक करत तिच्याकडील १७ लाखांचा मुद्देमाल घेऊन पसार झाला. दरम्यान आता त्याच्याविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला असून पोलिस शोध घेत आहेत.
लग्न झाल्यानंतर प्रदीप नाईकने त्या महिलेचे सोन्याचे आणि चांदीचे सर्व दागिने ताब्यात घेतले. त्याचसोबत दीड लाखांची रोख रक्कमही घेतली. त्या महिलेला कोल्ड्रिंग्स मधून गुंगीचे औषध दिले आणि सर्व मुद्देमाल घेऊन पसार झाला. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्या महिलेने तिच्या मुलीला बोलावून घेतले आणि सगळी हकिकत सांगितली. आरोपीने सोने, चांदी आणि दीड लाखांच्या रोख रक्कमेसह एकूण १७ लाख १५ हजारांचा ऐवज घेऊन पळ काढला.
प्रदीप नाईकने ज्या ठिकाणी कामाला असल्याचे सांगितले त्याठिकाणी नंतर चौकशी केली असता त्याने कोरोना काळातच काम सोडल्याची माहिती मिळाली. या प्रकरणी दिंडोशी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला असून पोलिस आरोपीचा शोध घेत आहेत.