मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – राज्यात महिलांवर अत्याचार वाढत असून त्यांच्यावर लक्ष ठेवण्यासाठी आता राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. गृहविभागाने त्यासाठवणी मास्टर प्लॅन केला असून प्रत्येक बिल्डिंगवर सीसीटीव्ही बसवण्याचे निर्णय घेण्यात येणार आहे. अनिल देशमुख यांनी त्यासंदर्भात माहिती देत मुंबईत अनेक ठिकाणी सीसीटीव्ही बसवले असून ३ हजारपेक्षा जास्त कॅमेरे बसवले जाणार आहेत, असे सांगितले. सध्या निर्भया फंडातून केंद्र व राज्य शासनाच्या हिस्स्यांतर्गत मुंबईत सीसीटीव्ही आणि अन्य प्रकल्प राबवण्यात येत आहेत. तसेच शहरात अंधाऱ्या आणि धोकादायक असलेल्या जागांवर पथदिवे लावण्यासाठी महानगरपालिकेला निधीही देण्यात आला आहे.
त्या ठिकाणी सीसीटीव्ही, ‘इमर्जन्सी कॉल बॉक्स’ लावण्याचे काम सुरू आहे. परत शहरातील पोलीस ठाण्यांच्या गस्ती वाहनावर व्हिडिओ रेकॉर्डिंगची यंत्रणा, प्रत्येक पोलीस ठाण्याच्या पाच पोलीस कर्मचाऱ्यांना शरीरावर लावण्याची कॅमेरा यंत्रणा, टॅबलेट संगणक इत्यादी साहित्य पुरवण्यात येत आहेत.
महिलांना तक्रार करता यावी यासाठी या निधीद्वारे कक्ष तयार करण्यात येणार असून तिथे महिला पोलीस, कायदाविषयक सल्लागार आणि महिला डॉक्टर असणार आहेत. त्याद्वारे घटनेच्या ठिकाणी जाऊन महिलेला मदत केली जाईल. तसेच दुसरीकडे मुंबई आणि पुणे शहरांसाठी सीसीटीव्ही सर्व्हेलन्स प्रकल्प राबवणार असून त्याच्या पहिल्या टप्प्यात मुंबईमध्ये ५,२०० सीसीटीव्ही कार्यान्वित करण्यात आले आहेत.
दुसऱ्या टप्प्याचेही काम सुरु असून ते पूर्ण होताच शहरात ३,६०० ठिकाणी १० हजार ७०० कॅमेरे कार्यान्वित होतील. या प्रकल्पात पोलिसांच्या १४३२ वाहनांवर जीपीएस बसवला असून महिलांच्या सुरक्षेसाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानयुक्त सुरक्षा प्रकल्पांना चालना देण्याचे आदेश गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिले आहेत.
आपत्तीकाळात तात्काळ प्रतिसादासाठी पोलीस विभागातर्फे राबवण्यात आलेल्या ‘डायल ११२’ ही हेल्पलाईन, मुंबई-पुणे ‘सीसीटीव्ही सर्व्हेलन्स प्रकल्प’, पोलीस ठाण्यांमधील सीसीटीव्ही प्रकल्प, निर्भया महिला सुरक्षा फंड अंतर्गत मुंबईत सुरू असलेल्या प्रकल्पांचा आढावाही देशमुख यांनी घेतला.
ते म्हणाले की, महिला अत्याचाराच्या घटना पाहता पोलीस विभागाने त्यावर कठोर कारवाई करत वेळीच प्रतिबंध घालावा. त्यासाठी आवश्यक अत्याधुनिक तंत्रज्ञानाचे प्रकल्प हाती घेतले पाहिजेत. तेव्हा आता जर तरुणींची छेड काढली तर खैरच नाही. कारण मुंबई पोलीस या सीसीटीव्हीद्वारे सगळ्यांवर नजर ठेवणार आहेत.