कोलंबो : वृत्तसंस्था – मिसेस श्रीलंका या सौंदर्य स्पर्धेत राडा घालणा-या मिसेस वर्ल्डला पोलिसांनी अटक केली आहे. श्रीलंकेची राजधानी कोलंबोमध्ये गेल्या आठवड्यात ही स्पर्धा पार पडली होती. तिच्यावर स्पर्धकांना जखमी करणे आणि संपत्तीचे नुकसान केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. तसेच पोलिसांनी एका मॉ़डेललाही अटक केली आहे. या स्पर्धेत झालेल्या राड्याची सध्या जगभरात चर्चा सुरु आहे.
कॅरोलीन जुरी (मिसेस वर्ल्ड) आणि मॉ़डेल चूला पद्मेंद्रला असे अटक केलेल्या दोघींची नावे आहेत.
प्राप्त माहितीनुसार, या दोघींनीही गेल्या आठवड्यात शनिवारी कोलंबो येथे आयोजित केलेल्या सौंदर्यवती स्पर्धेत हजेरी लावली होती. मिसेस श्रीलंका स्पर्धेत पुष्पिका डिसिल्वा ही स्पर्धक विजयी ठरली होती. त्यानंतर कॅरोलीन जूरीने डिसिल्वा ही घटस्फोटित असल्याचा दावा करत तिच्या विजेतेपदाचा मुकूट जबरदस्तीने काढून घेतला होता. या दरम्यान पुष्पिकाच्या डोक्याला जखम झाली होती. पुष्पिकाने याप्रकरणी पोलिसांमध्ये तक्रार दिली होती. आयोजकांनी झालेल्या या प्रकारावर पुष्पिकाची माफी मागितली आणि तिला पुन्हा एकदा विजेतेपदाचा मुकूट प्रदान केला. आपल्यासोबत झालेला प्रकार हा अपमानास्पद आणि अन्यायकारक असल्याचे पुष्पिकाने म्हटले. आपण पतीसोबत राहत नाही. मात्र, घटस्फोट झाला नसल्याचे तिने सांगितले. मिसेस वर्ल्ड कॅरोलिनच्या वर्तवणुकीवरही टीका सुरू आहे.