बहुजननामा ऑनलाइन टीम – कोरोनामुळे गेल्या वर्षभरापासून रखडलेल्या राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षा घेण्यासाठी आता हालचाली सुरु झाल्या आहेत. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून आज परीक्षेसंदर्भात अधिकृत तारखांची घोषणा (MPSC’s exam)होण्याची शक्यता आहे. त्यानुसार राज्यसेवा पूर्व परीक्षा या मार्च महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात तर अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा तिसऱ्या आठवड्यात घेतली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
कोरोना संकटामुळे एमपीएससीच्या परीक्षांना विलंब झाला आहे. या स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे अनेक विद्यार्थी परीक्षा कधी जाहीर होणार याच्या प्रतीक्षेत होते. तसेच परीक्षा लवकरात लवकर घ्याव्यात, अशी मागणी विद्यार्थ्यांकडून होत होती. दरम्यान आता मार्च महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात राज्य सेवा पूर्व परीक्षा तर तिसऱ्या आठवडय़ात अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा होणार आहे. दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा एप्रिल महिन्यात होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. आ या संदर्भात अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे. दरम्यान यापूर्वी मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाकडून मिळालेल्या स्थगितीनंतर एमपीएससीच्या परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी झाली होती. त्यानंतर ठाकरे सरकारने परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला होता.