नगर : बहुजननामा ऑनलाईन – कोरोनाबाधितांची संख्या अधिक वाढल्याने जिल्ह्यातच नाही तर राज्यात रेमडीसीवीर इंजेक्शनचा तुटवडा निर्माण झाला आहे. भाजपचे खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी रेमडीसीवीर बाबत व्हिडिओ शेअर करत एक मोठा खुलासा केला आहे. हा खुलासा त्याने समाज माध्यमाद्वारे शेअर केला आहे. त्यामध्ये डॉ. सुजय यांनी खासगी विमानाने दिल्लीला रवानगी करून तिथून रेमडीसीवीर अहमदनगर जिल्ह्यात आणले असल्याची माहिती त्यांनी दिलीय.
खा. सुजय विखे पाटील यांनी १९ एप्रिलला दिल्लीला गुप्तपणे रवाना झाले आणि तेथून एका कंपनीतून रेमडीसीवीर घेऊन ते खासगी विमानाने पुन्हा परतले. येताना विमानातूनच त्यांनी एक व्हिडिओ तयार करून ठेवला होता. आणि तो आज अपलोड झालाय. विखे पाटील म्हणाले, माझ्या परीने जमेल ती मदत मी नगर जिल्ह्यासाठी करण्याचा प्रयत्न करीत आहे. तरुण मुले तडफडून मरताना बघत आहे. ते मला पाहवत नाही. मला ज्यांनी खासदार केले, निवडून दिले, त्या लोकांसाठी मी माझ्या परीने प्रयत्न करीत आहे. यामध्ये पैसा कमावण्याचा कोणाचाच उद्देश नाही. लोकप्रतिनीधी म्हणून हे करणे आमची जबाबदारी आहे. याबाबत मला समाधान आहे, की मी हे रेमडीसीवीर इंजेक्शन आणू शकलो. असे त्या व्हिडिओमध्ये नमूद केले आहे.
पुढे डाॅ. विखे पाटील म्हणतात, माझ्या मनात पाप नाही. मी तेथील फॅक्टरीत गेलो. तेथे माझ्या मैत्री-संबंधाचा वापर केला. मदत घेतली आणि ही औषधे घेतली. माझ्यावर कारवाई होईल की नाही, हे माहित नाही. खासगी विमानाने ही औषधे आणली आहेत. माझ्या मनात पाप नाही. त्यामुळे मी कारवाईला घाबरत नाही, असे देखील त्यांनी म्हटलं आहे. या दरम्यान, नगर मध्ये कोरोनाचा आकडा वाढला आहे. यावरून अनेक प्रयत्न करून पण आरोग्य सेवा कमी पडत आहेत. रेमडीसीवीर , बेड, प्राणवायू अशा गोष्टींचा अभाव आहे. त्यातच सरकारी यंत्रणेकडून टोलवाटोलवी करताना पाहायला मिळाले आहे. अशा परिस्थितीत खा. डॉ.सुजय विखे पाटील यांनी नगर जिल्ह्यात रेमडीसीवीर आणून लोकांचा प्राणापासून बचाव करण्याचा प्रयत्न केला गेला आहे. त्यांच्या या व्हिडीओवरून राज्यात उत्सुकता असल्याचे दिसते.