बहुजननामा ऑनलाईन – प्रियकराबरोबर राहता यावे म्हणून एका महिलेने आपल्या एक वर्षाचा मुलला आणि तीन वर्षाची मुलीला घरात लॉक केले. नऊ दिवस बंद राहिल्यानंतर उपासमारीमुळे दोन्ही मुलांची प्रकृती अत्यवस्थ झाली आणि उपासमारीमुळे दोन्ही मुलांचा मृत्यू झाला. ही घटना युक्रेनची राजधानी कीव येथे २०१६ मध्ये घडली. या गुन्ह्यात 23 वर्षीय व्लादिस्लाव ट्रोखिमचुक या महिलेला न्यायलयाने आठ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, प्रियकरासोबत राहण्यासाठी या महिलेने तिच्या एक वर्षांच्या मुलाला आणि तीन वर्षांच्या मुलीला घरात कोंडून ठेवले. नऊ दिवसानंतर पोलीसांना माहिती मिळताच ते घटनास्थळी दाखल झाले. मात्र त्यापुर्वीच मुलांचा उपासमारीमुळे मृत्यू झाला होता. मुलांच्या आजारपणाचे कारण सांगून ऑनलाईन मदत मिळविण्यासाठी तिने मुलांवर अत्याचार केले असल्याची माहिती एका वृत्तसंस्थेने दिली आहे. तसेच बचाव दलाला घराच्या पाहणीदरम्यान मुलांनी घराच्या वॉलपेपरही खाण्याचा प्रयत्न केला असल्याच्या खुणा मिळाल्या आहेत.
मात्र महिलेने न्यायालयात सांगितले की, मी नेहमीच मुलांच्या चांगल्याचा विचार करत असे. मी मुलांच्या शिक्षणाबाबत आणि त्यांच्या चांगल्या आयुष्याची स्वप्ने पाहत होते. पण मी मुलांशी असे का वागले याबाबत मला स्वतःलाच कळत नाहीये. मात्र स्थानिक वृत्तवाहिनीच्या पत्रकाराने सांगितले की, निकाल लागल्यानंतर ही महिला कोर्टाबाहेर हसत होती आणि कसलीही खंत तिच्या चेहऱ्यावर दिसत नव्हती.