अयोध्या : वृत्तसंस्था – अयोध्या प्रकरणाचा निकाल लागल्यानंतर कोर्टाच्या निर्णयाची अंमलबजावणी सुरू असताना आंतरराष्ट्रीय हिंदू परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रवीण तोगडिया यांनी एक वादग्रस्त वक्तव्य केले आहे. अयोध्येत मशीद बांधायची असेल तर, ती हद्दीच्या बाहेर बांधली जावी. कारण अयोध्या हे अध्यात्मिक शहर आहे. अयोध्येच्या हद्दीत मशीद बांधू नये आणि हे योग्य ठरणार नाही. संपूर्ण देशात जर मशिदी बांधल्या तर, हिंदू समाज नाराज होईल. मक्केत मंदिर बांधले जाऊ शकत नाही, याबाबतीतही तसेच आहे, असे तोगडीया यांनी म्हटले आहे.
तोगडीया म्हणाले की, मंदिर बांधणे हे एक धार्मिक कार्य आहे. त्यामुळे या ट्रस्टमध्ये संत, आखाडे आणि धार्मिक व्यक्ती असाव्यात. हा राजकीय आखाडा होऊ नये यासाठी मंदिर ट्रस्टमध्ये राजकीय व्यक्तींना घेऊ नये. यासाठीच मी या ट्रस्टमध्ये सहभागी होण्यास इच्छुक नाही, असे तोगडीया म्हणाले.
तोगडीया यांनी केंद्र सरकारकडे मागणी करताना म्हटले की, सोमनाथ मंदिरासमोर हमीर सिंह गोहिल यांची समाधी आणि सरदार वल्लभभाई पटेल यांची प्रतिमा लावण्यात आली आहे. अयोध्येतील राम मंदिराच्या समोर अशाच प्रकारे महंत रामचंद्र दास, महंत अवैद्यनाथ आणि अशोक सिंघल यांचा पुतळा उभारण्यात यावा. मंदिर उभारणीच्या आंदोलनाबाबत यामुळे लोकांना माहिती मिळेल.