हैती : वृत्तसंस्था – हैतीची राजधानी पोर्ट ऑ प्रिन्सच्या ईशान्य दिशेला असलेल्या क्रुआ दि बुके सिव्हिल कारागृहातून 400 कैद्यांनी पलायन केले. यावेळी झालेल्या गोळीबारात तुरुंग अधिक्षकासह 25 जणांचा मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी (दि.25) घडली आहे. ज्यावेळी हा प्रकार घडला त्यावेळी कारागृहात 1542 कैदी होते. या घटनेबद्दल हैतीचे राष्ट्राध्यक्ष जोवलेन मोइस यांनी खेद व्यक्त केला आहे.
यापूर्वी देखील अशाच प्रकारची घटना घडली होती. 2012 मध्ये उभारण्यात आलेल्या या कारागृहातून 2014 मध्ये 300 कैद्यांनी पलायन केले होते. अर्नेल जोसेफ या गुन्हेगाराला तुरुंगातून नेण्यासाठी त्याच्या टोळीच्या लोकांनी हा प्रकार केल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. जोसेफ याच्यावर बलात्कार, अपहरण आणि खून असे गंभीर गुन्हे दाखल आहेत. या गुन्ह्यात त्याला 2019 मध्ये अटक करण्यात आली होती. त्याला क्रुआ दि बुके सिव्हील कारागृहात ठेवण्यात आले होते.
#UPDATE More than 400 prisoners were on the run in #Haiti on Friday after they escaped from jail in a violent breakout that left 25 people dead, including the prison directorhttps://t.co/PZxgfIzUWi pic.twitter.com/yCk7nOkjm9
— AFP News Agency (@AFP) February 27, 2021
कारागृह अधिक्षकाचा मृत्यू
जोसेफ हा तुरुंगातून फरार झाल्यानंतर दुचाकीवरून जात असताना पोलिसांनी त्याच्या दिशेने गोळीबार केला. यामध्ये त्याचा खात्मा झाला. फरार झालेल्या कैद्यांपैकी 60 कैद्यांना पुन्हा पकडण्यात पोलिसांना यश आले आहे. तर उर्वरित फरार कैद्यांचा पोलिसांकडून शोध सुरु आहे. दरम्यान, कैदी कसे फरार झाले, याचा तपास करण्यासाठी आयोगाची स्थापना करण्यात आली आहे. गोळीबाराच्या घटनेमध्ये कारागृह अधिक्षक पॉल जोसेफ हेक्टर यांचा मृत्यू झाला आहे.
सुरक्षा कर्मचाऱ्यांवर अंदाधुंद गोळीबार
स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, कैदी फरार होण्यापूर्वी मोठ्या संख्येने शस्त्रास्त्र सज्ज लोकांनी तुरुंगातील सुरक्षा कर्मचाऱ्यांवर अंदाधुंद गोळीबार केला. हा गोळीबार बराच वेळ सुरु होता. दरम्यान, हैतीचे राष्ट्राध्यक्ष जोवलेन मोइस यांनी शुक्रवारी (दि.26) ट्विट करुन या प्रकाराबद्दल खेद व्यक्त केला आहे. तसेच लोकांनी धैर्य राखण्याचे आवाहन मोइस यांनी केले आहे.