Mohol Solapur Murder Case | धक्कादायक! अंगावरील सोने चोरीसाठी शेतातील गड्यानेच केला मालकाचा खून; मृतदेहाचे केले तुकडे

December 23, 2024

सोलापूर: Mohol Solapur Murder Case | अंगावरील सोने चोरीसाठी शेतातील गड्यानेच मालकाचा खून करून, त्यांच्या मृतदेहाचे तुकड़े करून ते पुरून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याची घटना मोहोळ येथून समोर आली आहे. याप्रकरणी मोहोळ पोलिसांनी (Mohol Police) एकास अटक केली आहे. कृष्णा नारायण चामे (वय- ५२, रा काळेवाडी-पुणे, सध्या रा- यल्लमवाडी ता मोहोळ) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, यातील संशयित सचिन भागवत गिरी (वय-२५, रा सांघवी जिल्हा धाराशिव, सध्या रा-चामेवस्ती यल्लमवाडी) हा मृत कृष्णा चामे यांच्या शेतात शेतगडी म्हणून काम करीत होता. मालकाच्या अंगावर असलेल्या सोन्याचा त्याला लोभ सुटला.

दरम्यान (दि.१४) मृत कृष्णा चामे यांना यल्लमवाडी येथून अज्ञात व्यक्तीने मोटार सायकलवरून त्यांचे अपहरण केले. दरम्यान मृत कृष्णा चामे यांचा मुलगा विश्वजीत चामे याने वडील बेपत्ता झाल्याची फिर्याद मोहोळ पोलिसात दिली होती. तेव्हा पासून पोलीस संशयिताच्या मागावर होते.

दरम्यान पोलिसांनी संशयावरून चामे यांचा शेतगडी सचिन गिरी यास अटक केली. यावेळी पोलिसांनी कसून चौकशी केली असता त्याने सोन्याचे दागिने चोरण्यासाठी कृष्णा चामे यांच्या डोक्यात हातोडा मारून त्यांचा खून केल्याचे सांगितले. तसेच पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने त्यांच्या मृतदेहाचे चाकूने तुकडे केल्याचे म्हंटले. त्यानंतर पुरावे नष्ट करण्यासाठी कृष्णा चामे याने स्वतःच्या अंगावरील कपडे जाळून टाकले.

दरम्यान घटना स्थळाला अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर, अक्कलकोट उपविभागीय पोलीस अधिकारी विलास यामावर, पोलीस निरीक्षक रणजित माने, पोलीस उपनिरीक्षक करनेवाड यांनी घटनास्थळी भेटी दिल्या. याबाबत अधिक तपास पोलीस करीत आहेत.