Mohan Joshi On PM Modi Pune Visit | पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पुण्यात ऑनलाइन व्हर्च्यअल जाहीर सभा घ्याव्यात! बंद रस्त्यांमुळे त्रस्त पुणेकरांचा संताप – मोहन जोशी

November 12, 2024

पुणे : Mohan Joshi On PM Modi Pune Visit | विधानसभा निवडणुकीत भाजपाचा प्रचार करण्यासाठी पंतप्रधान व भाजपा नेते नरेंद्र मोदी यांच्या पुण्यातील स.प. महाविद्यालयाच्या मैदानावरील जाहीर सभेच्या आयोजनामुळे संपूर्ण मध्य पुण्यातील रस्ते वाहतुकीसाठी बंद केले गेले. तसेच आदल्या दिवशीदेखील रस्ते बंद कले गेले.

त्यामुळे लाखो पुणेकरांना अत्यंत मनस्ताप झाला असून, लांब-लांबचे रस्ते शोधत नागरिकांना जावे लागले. त्यामुळेच त्रस्त झालेल्या पुणेकरांमध्ये संतापाची लाट उसळली असून, मोदींनी अशा सभा बी.जे. मेडिकल कॉलेज ग्राऊंड अथवा रेसकोर्स अशा ठिकाणी घ्याव्यात, अन्यथा ऑनलाइन व्हर्च्युअल पद्धतीने जाहीर सभा घेतल्यास सुरक्षेच्या नावाखाली पुणेकरांना वेठीस धरले जाते, यातून तरी पुणेकरांची सुटका होईल. काही काळापूर्वी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात पंतप्रधान मोदी आले, तेव्हा असेच मध्य पुणे बंद केले गेले. त्याही वेळी पुणेकरांनी मनस्ताप भोगला. पुणे विमानतळाच्या विस्तारित कक्षाचे उद्घाटन, रुबी हॉल ते रामवाडी मेट्रोचे उद्घाटन आणि शिवाजीनगर ते कात्रज भुयारी मेट्रोचे उद्घाटन या तिन्हींच्या उद्घाटनांना पंतप्रधानांना वेळ नसल्यामुळे अनेक महिने विलंब झाला. अशा वेळीस महाविकास आघाडीतर्फे तीव्र आंदोलने झाल्यावर अखेरीस पंतप्रधान मोदींनी ऑनलाइन व्हर्च्युअल पद्धतीने उद्घाटन केले आणि मोदी येणार नसल्यामुळे पुणेकरांनीही सुटकेचा निःश्वास सोडला.

आता या सभेसाठी साऱ्या जिल्ह्यातून माणसे आणली जातात. त्यांचीही यात भर पडते. या सर्व त्रासामुळे भाजपचीच मते कमी होतील, हे भाजपवाल्यांना उमगत नाही, याचे आश्चर्य वाटते. जाहीर सभेला विरोध नाही. मात्र मध्यभागापासून दूर अशा सभा व्हाव्यात, अन्यथा ऑनलाइन व्हर्च्युअल पद्धतीने सभा घ्याव्यात, ही पुणेकरांची मागणी रास्तच आहे. भाजपाप्रमाणेच परवानगी देणाऱ्या पुणे पोलिसांनीदेखील याचा गांभीर्याने विचार करावा, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष आणि माजी आमदार मोहन जोशी यांनी म्हटले आहे.