पुणे : बहुजननामा ऑनलाइन – पुरेषा दाबाने पाणी पुरवठा होत नसल्यावरुन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी मंगळवारी स्वारगेट विभागात धडक देऊन खळखट्याक केले. कार्यालयात घुसून पाण्याचा माठ शासकीय मोटारीवर फोडून २५ हजारांचे नुकसान केल्याप्रकरणी मनसेच्या उपविभाग अध्यक्ष संग्राम तळेकरांसह पाचजणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी कसबा उपविभाग अध्यक्ष संग्राम तळेकर व त्यांच्या 4 कार्यकर्त्यांवर स्वारगेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत आशीत जाधव (वय 50, रा.चिंतामणीनगर) यांनी फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पाणीपुरवठा कमी दाबाने होत असल्याच्या निषेधार्थ काल मंगळवारी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कसबा उपविभाग अध्यक्ष संग्राम तळेकर आणि इतर कार्यकर्ते स्वारगेट पाणीपुरवठा विभागात आंदोलन करण्यासाठी एकत्रित आले होते. त्यांनी राजकिय पक्षाचे झेंडे घेऊन येथे “पाणी द्या पाणी द्या” अशा घोषणा दिल्या. तसेच येथील अधिकारी व कर्मचाऱ्यांना शिवीगाळ केली. त्याशिवाय कार्यालयातील पाणी पिण्याचा माठ शासकीय मोटारीवर फोडून २५ हजारांचे नुकसान केले. याप्रकरणी स्वारगेट पोलिस अधिक तपास करीत आहेत.