मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – महाराष्ट्रात कोरोनाने थैमान घातले आहे. राज्याची राजधानी मुंबईत कोरोना बाधित रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे. कोरोनाला रोखण्यासाठी मुंबई पालिकेकडून अनेक उपाय करण्यात आले. परंतु, मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्यावर मनसेने गंभीर आरोप केला आहे.
कोरोना रुग्णांसाठी उभारण्यात आलेल्या कोविड सेंटरच्या उभारणीत भ्रष्टाचार झाल्याच्या आरोपाचा पुनरुच्चार करतानाच मनसेनं थेट महापौर किशोरी पेडणेकर यांना लक्ष केलं आहे. मुंबईतील कोविड सेंटरचे कंत्राट महापौरांनी स्वत:च्या मुलाला मिळवून दिल्याचा गंभीर आरोप मनसेने केला आहे. मनसेचे सरचिटणीस व माजी नगरसेवक संदीप देशपांडे यांनी आज दादर येथे पत्रकार परिषद घेऊन हे आरोप केले आहेत.
पुत्र-मोहातून शिवसेना बाहेर निघेल का ?? #ResignMumbaiMayor
— Sandeep Deshpande (@SandeepDadarMNS) August 20, 2020
मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्यावर आरोप करताना देशपांडे यांनी सांगितले की, वरळी भागातील कोविड सेंटरमधील कंत्राट स्वत:च्या मुलाच्या कंपनीला पदाचा गैरवापर करुन देण्यात आले. याबाबतची कागदपत्रे त्यांनी पत्रकारांसमोर दाखवली. फक्त वरळी नाही तर मुंबईतील अन्य भागातही महापौराच्या मुलाच्या कंपनीला कंत्राट देण्यात आल्याचा आरोप यावेळी त्यांनी केला. महापौरांचे चिरंजीव साईप्रसाद पेडणेकर यांच्या कंपनीला नियमबाह्य कंत्राट देण्यात आलं असेही देशपांडे यांनी म्हटले आहे.
कोविड काळात आपत्कालीन संकट म्हणून महापालिकेकडून कोणत्याही प्रकारे टेंडर न काढता कामाचे वाटप केले जात आहे. या कामात आपल्याच ओळखीच्या माणसांना ज्यांना कोणत्याही कामाचा अनुभव नसताना कामांचे कंत्राट दिले जातात. महापालिकेचा भ्रष्टाचार चव्हाट्यावर येऊ नये यासाठी सभागृह चालू दिले नाही.
पंतप्रधानांपासून सर्वजण व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे काम करत असताना मुंबई महापालिकेचे सभागृह कामकाज का चालत नाही ? असा सवाल त्यांनी केला आहे. भ्रष्टाचाराविरोधात मनसे कायम आवाज उचलणार आहे. मुंबई महापालिकेत काँग्रेसचे विरोधी पक्षनेते आहेत त्यांनीही हा मुद्दा सभागृहात उचलून धरावा, असं आवाहन संदिप देशपांडे यांनी केले आहे. तसेच महापौर किशोरी पेडणेकर यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारत तात्काळ राजीनामा दिला पाहिजे अशी मागणी देशपांडे यांनी केली आहे. या पत्रकार परिषदेला मनसेचे माजी आमदार नितीन सरदेसाई आणि माजी नगरसेवक संतोष धुरी हे देखील उपस्थित होते.