मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी बुधवारी (दि. 26) वर्षा निवासस्थानी जाऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. तब्बल अर्धा तास ही बैठक झाली. यावेळी मंत्रिमंडळ बैठकीत झालेली खडाजंगी आणि राष्ट्रवादीच्या मंत्र्यांच्या कार्यपद्धतीवर आलेल्या आक्षेपावरही या बैठकीत चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. यावरुन मनसे नेते संदीप देशपांडे यांनी ट्विट करून ठाकरे सरकार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. कोरोनाच्या संकटापासून वाचवण्यासाठी नाही तर सरकार वाचवण्यासाठी होममध्येच असणाऱ्यांचे जोरात हवन चालू आहे, अशी चर्चा आहे. कितपत खरे ते त्या देवालाच ठाऊक असे खोचक ट्विट देशपांडे यांनी केले आहे.
करोना च्या संकटापासून वाचण्यासाठी नाही तर सरकार वाचवण्यासाठी "होम"मध्येच असण्यारांचे जोरात हवन चालू आहे अशी चर्चा आहे. कितपत खरी ते त्या "देवालाच" ठाऊक.
— Sandeep Deshpande (@SandeepDadarMNS) May 27, 2021
दरम्यान, पवार आजारपणातून बरे झाल्यानंतर ही त्यांची पहिलीच भेट आहे. शरद पवारांनी घेतलेली मुख्यमंत्र्यांच्या भेटीमुळे राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे. तौक्ते वादळातील नुकसानग्रस्तांना मदत, कोरोनाचे संकट, म्युकरमायक्रोसिसचे संकट, लॉकडाऊनमुळे अनेक घटकांवर आलेल्या संकटासह मराठा आरक्षणावर या बैठकीत चर्चा झाल्याचे समजते. तसेच, मंत्रिमंडळ बैठकीत झालेली खडाजंगी आणि राष्ट्रवादीच्या मंत्र्यांच्या कार्यपद्धतीवर आलेल्या आक्षेपावरही या बैठकीत चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.