MLA Rohit Pawar | रोहित पवार अजितदादांच्या मदतीला! ‘दिलगिरी व्यक्त करूनही मित्रपक्षाकडून अजितदादांची जाणीवपूर्वक मीडिया ट्रायल’
सोलापूर : MLA Rohit Pawar | माढा तालुक्यातील अवैध मुरूम उत्खनन प्रकरणाने राजकारण तापल्याचे दिसत आहे. काही दिवसांपूर्वी महिला आयपीएस अधिकाऱ्यांशी केलेल्या कठोर भाषेतील संभाषणाचा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. आता याच व्हिडिओवरून विरोधक आक्रमक झाले असून, अजित पवारांना कठोर शब्दांत धारेवर धरले जात आहे. या वादग्रस्त प्रकरणात अजित पवारांच्या बचावासाठी पुतणे आमदार रोहित पवार समोर आल्याचे पाहायला मिळते. रोहित पवारांनी आपल्या सोशल मीडियावरती एक पोस्ट शेअर करत यावर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
कुर्डु प्रकरणात अजित पवारांचा केवळ हिंदी भाषेमुळे आणि बोलण्याच्या शैलीमुळे घोळ झाला. अजित पवारांनी दिलगिरी व्यक्त करून देखील जाणीवपूर्वक मीडिया ट्रायल मित्रपक्षाकडून सुरू असल्याचा दावा आमदार रोहित पवारांनी केला आहे. पक्षातील दोन आणि तीन नंबरच्या जेष्ठ नेत्यांकडून सध्या राष्ट्रवादीच्या मित्रपक्षाला साजेशी भूमिका घेतली जात असून, स्वहितासाठी अंतर्गत कुरघोड्या केल्या जात असल्याचा आरोप देखील त्यांनी केला. पक्षातील अंतर्गत कुरघोड्यांमुळे आमदार सोबत असूनदेखील अजित पवारांच सर्वकाही आलबेल आहे असे नाही, असा टोला देखील रोहित पवारांनी लगावला आहे.
काय म्हणाले रोहित पवार?
कुर्डुवाडी प्रकरणात महिला आयपीएस अधिकारी यांनी घेतलेली भूमिका योग्यच होती पण त्याठिकाणी झालेला घोळ अजितदादांच्या हिंदीमुळे आणि बोलण्याच्या शैलीमुळे झाला, हे संपूर्ण महाराष्ट्राला माहीत आहे. याबद्दल स्वतः अजितदादांनी दिलगिरी व्यक्त केली. पण तरीही जाणूनबुजून काही प्रामाणिक पण सिलेक्टिव्ह भूमिका घेणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांना पुढे करून मीडिया ट्रायल केली जात आहे हे मात्र नक्की ! मित्र पक्षांच्या नेत्यांची विनाकारण मीडिया ट्रायल करण्यापेक्षा शेतकऱ्यांच्या प्रश्नांची, युवांच्या प्रश्नांची, महिला सुरक्षेच्या विषयाची, पुरावे दिलेल्या भ्रष्टाचार प्रकरणांची मीडिया ट्रायल करून राज्याच्या नेतृत्वाने कार्यवाही केली तर अधिक योग्य राहील!
राजकीय स्कोअर सेट करण्यासाठी आपल्या नेत्याची विनाकारण मीडिया ट्रायल घेतली जात असताना पक्षाच्या दोन तीन नंबरच्या जेष्ठ नेत्यांनी मात्र कुरघोड्या करणाऱ्या मित्रपक्षाला प्रो भूमिका घेऊन आपल्याच पक्षात स्वहितासाठी अंतर्गत कुरघोड्या करणे कितपत योग्य आहे? असो पक्षात “चहापेक्षा किटली गरम असणारे” एक दोन सहकारी असले की आमदार सोबत असूनही सर्वकाही आलबेल असतेच असे नाही, याचा अनुभव पक्ष नेतृत्वाला यानिमित्ताने आलाच असेल.



Comments are closed.