मुंबई : बहुजननामा ऑनलाइन – आज शिवसेनेसाठी अत्यंत महत्वाचा दिवस आहे. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात राज्यात महाविकासआघाडीचे सरकार स्थापन होणार आहे. त्यामुळे महाविकासआघाडीच्या नेत्यांकडून हा ऐतिहासिक क्षण जपला जावा म्हणून प्रयत्न होणार आहेत. काही तासातच उद्धव ठाकरे राज्याच्या २९ व्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. ठाकरे घरातील आणि ठाकरे घराच्या राजकीय कारकिर्दीतील पहिला व्यक्ती महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होणार आहे. याच पार्श्वभूमीवर आज सुप्रिया सुळे यांनी ट्विट करत आपल्या भावना व्यक्त केल्या.
२० वर्षानंतर राज्यात शिवसेनेचा मुख्यमंत्री होणार असल्याने शिवसैनिकांमध्ये वेगळाच जल्लोष दिसून येत आहे. यावर ट्वीट करत सुप्रिया सुळे म्हणाल्या की, माँसाहेब आणि आदरणीय बाळासाहेब..! आज तुमची खूप आठवण येतेय. हे सर्व पाहायला तुम्ही दोघे असायला हवे होतात. तुम्हा दोघांनी मला मुलीपेक्षाही जास्त प्रेम दिले. तुम्ही माझ्या आयुष्यात स्पेशल होता,आहात आणि राहाल.
माँसाहेब आणि आदरणीय बाळासाहेब…! आज तुमची खुप आठवण येतेय. हे सर्व पहायला तुम्ही दोघे असायला हवे होतात.तुम्हा दोघांनी मला मुलीपेक्षाही जास्त प्रेम दिले. तुम्ही माझ्या आयुष्यात स्पेशल होता,आहात आणि राहाल.
— Supriya Sule (@supriya_sule) November 28, 2019
सुप्रिया सुळे यांनी हे ट्विट करत महाविकासआघाडीच्या भावनाच मांडल्या आहेत. सुप्रिया सुळे यांच्यावर बाळासाहेब ठाकरे यांचे विशेष प्रेम होते. हे आपल्या सर्वांना माहितीच आहे. ते त्यांना आपली मुलगीच मानत असत. ज्यावेळी सुप्रिया सुळे पहिल्यांदा निवडणूकीच्या रिंगणात उभ्या होत्या , त्यावेळी भाजपने त्यांच्या विरोधात उमेदवार देण्याची तयारी सुरु होती. तेव्हा बाळासाहेब ठाकरे यांनी शरद पवारांना फोन लावून सांगितले की, आपली मुलगी निवडणूक लढवत आहे, तिच्या विरोधात कोणीही उमेदवार देणार नाही, ती बिनविरोध निवडून येईल असे स्पष्ट करत सुप्रिया सुळेंच्या पाठिशी आपण ठामपणे उभे आहोत असे त्यांनी सांगितले होते. त्याची आठवण कदाचित आज सुप्रिया सुळेंना झाली असावी. त्यानंतर आज शिवसेनेच्या आनंदाच्या क्षणी त्या देखील एक महत्वाची भूमिका बजावत असल्याने त्यांनी आज ट्विट द्वारे आपल्या भावना व्यक्त केल्या.
Visit : bahujannama.com