बहुजननामा ऑनलाईन- एटीएम केंद्रात आलेल्या नागरिकांची दिशाभूल करून त्यांच्या खात्यावरून पैसे काढणार उच्च शिक्षित भामटा बँकेच्या सतर्कतेने पोलिसांच्या हाती लागला आहे. औन्ध भागात हा प्रकार घडला होता. नोकरीनिमित्त तो पुण्यात आला होता. दीपक राजेंद्र सोनी (वय 30, मध्यप्रदेश) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. याबाबत रुपी सिंग (वय 35, बाणेर) यांनी चतुशृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दीपक सोनी हा मूळचा मध्यप्रदेश राज्यातील आहे. त्याचे MBA चे शिक्षण झाले आहे. तो काही दिवसांपूर्वी पुण्यात नोकरीनिमित्त आला आहे. नोकरीच्या शोधात होता.
दरम्यान काही दिवसांपूर्वी तो औन्ध येथील डी.पी. रस्त्यावर युनियन बँक ऑफ इंडियाचे एटीएम आहे. येथे एक महिला पैसे काढण्यासाठी गेली होती. तयावेळी दीपक सोनी हा देखील तेथे गेला होता. महिलेने एक मशीनमध्ये एटीएम टाकून पैसे काढत असताना त्यावेळी दीपक याने त्यांना हे मशीन खराब असून, शेजारी असणाऱ्या मशीनमधून पैसे काढा असे सांगितले. महिलेने विश्वास ठेवून तेथील एटीएम कार्ड बाहेर काढले आणि दुसऱ्या मशीनकडे गेल्या. मात्र त्याचवेळी दीपकने महिलेचा पिन क्रमांक चोरून पाहून पहिल्या मशिनमधून 6 हजार 500 रुपये काढुन घेतले. या महिलेला हा प्रकार लक्षात आल्यानंतर त्यांनी बँकेशी संपर्क साधला. त्यावेळी सीसीटीव्हीची पडताळणी केली. त्यात दीपक हा कैद झाला होता.
बँकेच्या मॅनेजर रुपी सिंग बँकेच्या वतीने चतुशृंगी पोलिसांशी संपर्क साधून तक्रार दिली. यावेळी पोलिसांनी तेथील सुरक्षा रक्षक याच्याकडे चौकशी केली. त्याने दीपक हा येथे येत असल्याचे सांगितले. पोलिसांनी तो आल्यानंतर कळवण्याची माहिती दिली. त्यानंतर दीपक आला असता सुरक्षा रक्षकाने एटीएम केंद्रात जाताच बाहेरून शटर लावून पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली. अधिक तपास उपनिरीक्षक मोहन जाधव हे करत आहेत.