मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – मागच्या काही दिवसांपूर्वी सगळ्या दूध विक्रेत्या कंपन्यांनी दुधाच्या दरात वाढ केली होती. पण आता परत एकदा दुधाच्या दरात वाढ होणार असून प्रति लिटर ४ ते ५ रु.ची आणि दुग्धजन्य पदार्थांच्या दरात ८ ते १० रु.ची वाढ अपेक्षित आहे, असे अमूलचे व्यवस्थापकीय संचालक आर.एस. सोढी यांनी एका वृत्तसंस्थेसोबत बोलताना सांगितले आहे. त्यामुळे दुधाचे दर लवकरच वाढू शकतात.
ज्या कंपन्या दूध पुरवठा जास्त करू शकतात त्यांना याचा मोठा फायदा होणार असल्याचा अंदाजही सोढी यांनी व्यक्त केला आहे. ‘दूध उत्पादक कंपन्यांनी गेल्या तीन वर्षांमध्ये दोनदा दुधाच्या किमती वाढवल्या आहेत. त्यामुळे दूध उत्पादक शेतकऱ्यांचे उत्पन्न २०१८ च्या तुलनेत २० ते २५ टक्क्यांनी वाढलं आहे,’ असे सोढी म्हणाले.
तर अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पात दूध उद्योगासाठी बऱ्याच चांगल्या तरतुदी केल्या असल्याचेही सोढी यांनी सांगितले. सध्या देशात ५३.५ मेट्रिक टन दुधावर प्रक्रिया होत असून २०२५ पर्यंत हा आकडा १०८ मिलियन मेट्रिक टनवर नेण्याचे सरकारचे उद्दिष्ट आहे. तसेच त्यासाठी ४० ते ५० हजार कोटींची गुंतवणूक आवश्यक असल्याचेही सोढी म्हणाले. दुधासह इतरही उत्पादनांना एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेण्यासाठी रेल्वे आणि नागरी उड्डाण मंत्रालय अनुक्रमे कृषी उड्डाण आणि किसान रेल या प्रकल्पांवर काम करणार आहेत. त्यामुळे दूध आणि शेती उद्योगाला चालना मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.