पुणे : बहुजननामा ऑनलाईन – भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणी आरोप असलेले आणि समस्त हिंदू आघाडीचे कार्याध्यक्ष मिलिंद एकबोटे यांना सासवडमध्ये गोरक्षकांकडून लाथा बुक्क्यांनी मारहाण करण्याचा प्रकार सासवडमधील झेंडेवाडीत मंगळवारी रात्री साडेदहा वाजता घडला. याप्रकरणी पोलिसांनी ४० ते ५० जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
पंडित मोडक, विवेक मोडक हंबीरराव मोहिते गो-शाळा चालवितात. ही गो-शाळा व्यवस्थित चालवत नसल्याचे मिलिंंद एकबोटे यांचे म्हणणे आहे. या गोष्टीवरून त्यांच्यात वाद होता. झेंडेवाडीत एका कार्यक्रमादरम्यान मिलिंद एकबोटे आले होते. त्यावेळी मारुती मंदिरात एकबोटे प्रसाद घेण्यासाठी बसले असताना मोडक यांचे ४० ते ४५ समर्थक आले. त्यांनी एकबोटे व त्यांच्याबरोबरच्या तिघांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्यात तिघेही किरकोळ जखमी झाले आहेत. यासंदर्भात अधिक तपास सासवड पोलीस करत आहेत.