नवी दिल्ली : वृत्तसंस्था – इंग्लंडचा माजी कर्णधार मायकल वॉन याने भारताचा कर्णधार विराट कोहली संदर्भात केलेल्या विधानामुळे वादाला तोंड फुटले आहे. एका मुलाखतीत वॉन म्हणाला, न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियमसन भारतीय असता तर तो जगातील महान फलंदाज म्हणून ओळखला गेला असता. वॉनच्या या विधानावर आता चौफेर टीका होऊ लागली आहे. ऑस्ट्रेलियातील क्रीडा पत्रकार अमांडा बॅलीने वॉनच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली आहे. एका चाहत्याच्या पोस्टला बॅलीने उत्तर दिले आहे. संबंधीत चाहत्याने बॅलीला विचारले की, मायकल वॉनने केन विलियमसनला विराट कोहली पेक्षा चांगला फलंदाज म्हटले आहे. यावर तुमचे काय मत आहे? बॅलीने यावर उत्तर दिले की मला वॉनचे लोकेशन पाठव असे म्हटले आहे.
Send me Michael Vaughan’s location https://t.co/CXu5eAp23b
— Chloe-Amanda Bailey (@ChloeAmandaB) May 17, 2021
एका मुलाखतीत वॉन म्हणाला होता की, केन विलियमसन भारतीय असता तर त्याला जगातील सर्वोत्तम क्रिकेटपटूमध्ये स्थान मिळाले असते. पण प्रत्यक्षात असे नाही. तुम्हाला हे म्हणण्याचा अधिकार नाही की विराट कोहली महान नाही. कारण सोशल मीडियावर तुम्हाला ट्रोल केले जाईल. यामुळेच काही अधिक लाइक्स आणि क्लिक मिळवायचे असतील तर विराट कोहली महान असे म्हणा. पण केन विलियमसन सर्व प्रकारच्या क्रिकेटमध्ये विराट इतका महान आहे. वॉनच्या या वक्तव्यावर पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू सलमान बटने प्रतिक्रिया दिली आहे. विराट आणि केन यांची तुलना करणारा वाद अनावश्यक आहे. कोहली अशा देशातून येतो ज्याची लोकसंख्या अधिक आहे. त्यामुळेच त्याच्या चाहत्याची संख्या देखील अधिक आहे.
या शिवाय सध्याच्या काळात जगातील अन्य कोणत्याही फलंदाजाच्या नावावर 70 आंतरराष्ट्रीय शतक नाहीत. तो मोठ्या कालावधीपासून फलंदाजांच्या यादीत अव्वल आहे. कारण त्याची कामगिरी शानदार आहे. यामुळे या तुलनेला काही अर्थ नाही. बट इतक बोलून थांबला नाही. पुढे तो म्हणाला, या दोघांत तुलना कोण करत आहे तर मायकल वॉन. तो इंग्लंडसाठी चांगला कर्णधार असेल. पण ज्या पद्धतीने तो फलंदाजी करत होता ते आकडेवारीत दिसत नाही. वॉन एक चांगला कसोटी फलंदाज होता पण वनडेत त्याच्या नावावर एक देखील शतक नाही. दरम्यान बटने अशा पद्धतीने हल्ला चढवल्यावर वॉनला राग आला नसता तरच नवल. वॉनने 2010 साली इंग्लंडविरुद्धच्या कसोटी सामन्यात स्पॉट फिक्सिंग केल्या प्रकरणी बटची खिल्ली उडवली आहे.