नवी दिल्ली : वृत्तसंस्था – मध्य प्रदेशातील छतरपूर जिल्ह्यातून एक अनोखे प्रकरण समोर आले आहे, एका मानसिक रूग्णाने डॉक्टरच्या खुर्चीवर बसून लोकांवर उपचार केले आहे. एवढेच नाही तर त्याने अनेक रुग्णांना औषधेही दिली. या घटनेचा मनोरंजक खुलासा झाला आहे. ही घटना छतरपूरच्या जिल्ह्यातील एका रूग्णालयाची असून तेथे एका मानसिक रूग्णाने डॉक्टरच्या खुर्चीवर बसून बर्याच लोकांवर उपचार केले. लोक येत होते आणि तो औषधे लिहून देत होता. त्याने डझनभराहून अधिक लोकांची तपासणी केली आणि औषध देखील लिहून दिले.
ओपीडीच्या वेळी रुग्णालयात गर्दी होती आणि सर्व डॉक्टर रूग्णांना पाहण्यात व्यस्त होते, त्यानंतर चेंबर क्रमांक 20 मध्ये रुग्णांची ओळ सुरू झाली, तिथे असलेले डॉक्टर हिमांशू बाथम आपल्या खुर्चीवर नव्हते. काही वेळाने लोकांना दिसले की आत बसलेला एक माणूस एक रुग्णाला तपासत आहे, औषधे लिहून देत आहे. त्याने डझनभरहून अधिक रुग्णांना तपासले. एकापाठोपाठ एक शासकीय मेडिकल स्टोअरमध्ये लाल पेनसह लिहिलेली पत्रके येऊ लागली तेव्हा स्टोअरमध्ये उपस्थित असलेल्या व्यक्तीला संशय आला. यानंतर त्याने हॉस्पिटलमध्ये जाण्याचा निर्णय घेतला.
त्याने औषधे लिहित असलेल्या डॉक्टरचा चेंबर क्रमांक विचारुन तो तिथे पोहोचला तेव्हा हे प्रकरण उघडकीस आले. तिथे बसलेला एक मानसिक रुग्ण रुग्णांची तपासणी करत होता. हॉस्पिटल व्यवस्थापनाला याची माहिती मिळताच खळबळ उडाली. प्रकरण उघडकीस येताच रुग्णालयातील कर्मचार्यांनी मानसिक रूग्णाला कक्षेतून बाहेर काढले व सतर्कतेचा इशारा दिला. मनोरंजक गोष्ट अशी आहे की, जेव्हा त्याला विचारले गेले तेव्हा तो म्हणाला की, रूग्ण लाईनमध्ये थांबून खूप वैतागले होते आणि तेथे डॉक्टर नव्हते म्हणून मी उपचार दिला. इतकेच नाही तर मानसिक रूग्णाने स्वत: ला दिल्ली एम्सचे डॉक्टर असल्याचे देखील सांगितले. दुसरीकडे, मानसिक रुग्ण रुग्णालयाच्या आवारात फिरताना दिसला. माध्यमांशी बोलताना तो इंग्रजीत बोलत होता व स्वतःबद्दल माहिती देत होता. जेव्हा त्याला विचारले की, त्याने असे करणे अधिकृत नाही तरी देखील असे का केले ? यावर तो म्हणाला की, ‘सर्व औषधे योग्य प्रकारे लिहिली आहेत हे तपासा.’