लखनौ : बहुजननामा ऑनलाईन – लोकसभेच्या तोंडावर राजकारणात जवळपास २४ वर्षापासून एकमेकाचे कट्टर विरोधी राहिलेले समाजवादी पक्षाचे सर्वेसर्वा मुलायम सिंह यादव आणि बहुजन समाज पक्षाच्या मायावती या तब्बल २४ वर्षांनी आज एकाच व्यासपीठावर एकत्र येत आहेत. सपा- बसपा महाघाडीची चौथी प्रचार सभा मैनपुरी येथे होत आहे. मैनपुरी हा समाजवादी पक्षाचा बालेकिल्ला आहे.या मतदार संघात मायावती ह्या मुलायम सिंह यांचा प्रचार करणार आहे.
देशातील भाजप सरकारला टक्कर देण्यासाठी बसपाच्या मायावती यांनी जुने हेवेदावे विसरून मुलायम सिंह यांच्यासाठी प्रचार करणार आहेत. विशेष म्हणजे १९९५ नंतर गेस्ट हाऊस प्रकरणानंतर पहिल्यांदाच मायावती, मुलायम सिंह हे एका व्यासपीठावर येत आहेत.
या माध्यमातून सपा-बसपा एकजूट असल्याचा संदेश देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. तसेच काँग्रेस आणि भाजप शिवाय तिसरा पर्याय आहे हेही दाखविण्याचा यामागचा उद्देश आहे, अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे . लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेशातील राजकीय समीकरणे संपूर्ण बदलली आहेत. उत्तर प्रदेशात समाजवादी पक्ष आणि बहुजन समाज पक्ष यांची महाआघाडी झाली आहे. भाजपला मात देण्यासाठी महाआघाडीने जोरदार मोर्चेबांधणी केली आहे.