बहुजननामा ऑनलाईन – अवघ्या वर्षभरापूर्वी लग्न झालेल्या विवाहितेने राहत्या घरात विष (Poision) प्राशन करून आत्महत्या केली आहे. सांगवी (ता. बारामती) येथे गुरुवारी (दि. 27) ही घटना उघडकीस आली. मात्र, आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट न झाल्याने ही आत्महत्या आहे की घातपात याबाबत परिसरात चर्चेला उधाण आले आहे
गितांजली अभिषेक तावरे ( वय 21 रा. सांगवी ) असे आत्महत्या केलेल्या मृत विवाहितेचे नाव आहे. बारामती तालुका पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गितांजली यांनी राहत्या घरात दोन दिवसांपूर्वी विष प्राशन केले होते. दरम्यान विवाहित महिलेला बारामतीमधील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. मात्र, प्रकृती चिंताजनक झाल्याने पुढील उपचारासाठी पुण्यातील खासगी रुग्णालयात दाखल केले. त्याठिकाणी उपचारादरम्यान तिचा गुरुवारी सकाळी मृत्यू झाला. दरम्यान, मृतदेह पुण्यात असल्याने सायंकाळी उशिरापर्यंत गुन्हा दाखल झाला नसल्याचे पोलीस निरीक्षक महेश ढवाण यांनी सांगितले. दरम्यान सकाळपासूनच बारामती-फलटण राज्यमार्ग तसेच विवाहित महिलेच्या बंगल्याबाहेर पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवला आहे.