बहुजननामा ऑनलाईन टीम : पावसाळा ऋतु संपल्यावरही आणखी दोन महिने पावसाने राज्यात थैमान घातले होते. त्यामुळे लोक खूप हैराण देखील झाले होते. मात्र आता पुन्हा एकदा आपल्याला पाऊस सतावण्यासाठी येतो की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. महाराष्ट्रात यावेळी ऐतिहासिकच पाऊस झाल्याची नोंद झाली आहे. या पावसामुळे अनेकांचे खूप नुकसान देखील झाले आहे. पुन्हा एकदा पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.
अरबी समुद्रात ‘पवन’ नावाचे चक्रीवादळ सोमालियाच्या दिशेने पुढे सरकत आहे. याचा परिणाम म्हणून ४ डिसेंबरला कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल. ४ आणि ५ डिसेंबर रोजी मुंबई आणि आसपासच्या परिसरात आकाश अंशतः ढगाळ राहिल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
गेल्या २४ तासात मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी तर कोकण, गोव्यात तुरळक ठिकाणी पावसाची नोंद झाली आहे. मराठवाडा आणि विदर्भ येथील वातावरण मात्र नॉरमल आहे. तेथे थोडीशी गरमीही जाणवत आहे. तर कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्याच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत उल्लेखनीय वाढ झाली आहे. विदर्भात काही भागात लक्षणीय वाढ झाली आहे. महाराष्ट्राच्या काही भागात किमान तापमान सरासरीच्या जवळपास नोंदविण्यात आले आहे. ४ डिसेंबरला महाराष्ट्र आणि गोव्याच्या किनाऱ्यावर सोसाट्याचा वारा असल्याचेही कळत आहे. समुद्र खवळलेला राहिल त्यामुळे मच्छीमारांनी समुद्रात उतरु नये, असे आवाहन हवामान खात्याने केले आहे.
Visit : bahujannama.com