मराठा व्यापारी संघटनेतर्फे शिवदौड मॅरेथॉन 

तृतीयपंथी
February 15, 2019
धुळे : बहुजननामा ऑनलाईन – येथील मराठा व्यापारी संघटनेतर्फे शिवजयंतीनिमित्त दि. १९ फेब्रुवारीला ‘शिवदौड’ मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमाचे हे दुसरे वर्ष आहे. शहरातील पित्रेश्वर कॉलनी मैदानापासून सकाळी ७.३० ला मॅरेथॉनला सुरुवात होईल. पोलिस अधीक्षक विश्वास पांढरे यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून स्पर्धा सुरु होईल. उपविभागीय अधिकारी विक्रम बांदल, तहसीलदार चंद्रशेखर देशमुख, पोलिस उपअधीक्षक संदीप गावित, मुख्याधिकारी अमोल बागूल, निरीक्षक संजय सानफ, तालुका पोलिस ठाण्याचे सहायक निरीक्षक किरणकुमार खेडकर, थाळनेरचे सहायक निरीक्षक विनोद पाटील, डॉक्टर्स संघटना, वकील संघटनेसह विविध संघटना, संस्थांचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.
पित्रेश्वर कॉलनी, करवंद नाका, गुजराथी कॉम्प्लेक्स, पाचकंदील, एसपीडीएम महाविद्यालय, वाघाडी टी पॉइंट, निमझरी नाका हे पाच किमीचे अंतर पूर्ण करुन पुन्हा पित्रेश्वर कॉलनी मैदानावर मॅरेथॉनचा समारोप होणार आहे. तेथे विजेत्या स्पर्धकांना पारितोषिके दिली जाणार आहेत. मॅरेथॉन पूर्ण करणाऱ्या सर्व स्पर्धकांना प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात येणार आहे. मॅरेथॉनच्या मार्गावर पाणी व वैद्यकीय सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत.
महिलांमध्ये आरोग्यविषयक जनजागृती करण्यासाठी ‘जिजाऊ वॉक फॉर हेल्थ’ उपक्रमांतर्गत शहरातील युवती, महिला मॅरेथॉन पाठोपाठ चालणार असून पाच किमीचे अंतर पूर्ण करणार आहेत. यावेळी जिजाऊंचा सजीव देखावा सादर करण्यात येणार आहे. मॅरेथॉनमध्ये सहभागी होण्यासाठी छोटू कोल्हापुरी (करवंद नाका), विशाल चष्माघर (गुजराथी कॉम्प्लेक्स), आयडीया गॅलरी (बसस्थानकासमोर), सायबर लव्ह (निमझरी नाका), श्­याम जनरल स्टोअर्स (मेनरोड), गुरु कॉम्प्युटर्स (बाजार समिती संकूल), राजे मेडीकल (सुभाष कॉलनी), आदर्श सायबर कॅफे (निमझरीरोड) येथे नावे नोंदवावीत, असे आवाहन करण्यात आले आहे.