बहुजननामा ऑनलाइन टीम – फरीदाबाद : वृत्तसंस्था – तामिळनाडूमधील ( Tamilnadu) मनुस्मृतीवरील(Manusmriti) प्रकरण चांगलेच तापल्याचे दिसून येत आहे.विदुथलई चिरुथैगल काच्ची पक्षाचे प्रमुख टी. तिरुमावलवन ( T. Tirumavlavan) यांनी मनुस्मृतीवर(Manusmriti) केलेल्या वक्तव्याचे प्रकरण चांगलेच तापले आहे. तिरुमावलवन यांच्या वक्तव्यावर राज्यात विरोध होऊ लागला आहे. भारतीय जनता पक्षात नुकताच प्रवेश केलेल्या खुशबू सुंदर ( Khushbu Sundar) यांना पोलिसांनी चेंगलपट्टू जिल्ह्यात ताब्यात घेतले आहे. त्या तिरुमावलवन यांच्या मनुस्मृतीवरील टिप्पणीचा विरोध करण्यासाठी जात होत्या. खुशबू सुंदर यांनी याच महिन्याच्या सुरुवातीला भारतीय जनता पक्षात प्रवेश केला होता.
विदुथलई चिरुथैगल काच्ची पक्षाचे प्रमुख टी. तिरूमावलवन यांनी मनुस्मृतीवर टीका करताना मनुस्मृती हा ग्रंथ महिलांचा अपमान करत असून त्यांना खालचे स्थान देते असे म्हटले होते . मनुचा धर्म महिलांशी केवळ उपभोगाची वस्तू अर्थात शरीर विक्रय करणाऱ्या महिलांच्या रुपात व्यवहार करतो. या कारणामुळे मनुस्मृतीवर बंदी आणली पाहिजे, असे वक्तव्य टी. तिरूमावलवन यांनी एका जाहीर कार्यक्रमात केले होते. त्यानंतर त्यांच्या या वक्तव्याला अनेकानी विरोध केला होता. आज भारतीय जनता पक्षाच्या महिला आघाडीने कुड्डलोर येथे निदर्शनांचे आयोजन केले होते.
हे आयोजन खुशबू सुंदर यांच्या नेतृत्वात होणार होते. कुड्डलोरला जात असतानाच पोलिसांनी खुशबू सुंदर यांना ताब्यात घेतले. तुरुमावलवन यांनी आपल्या वक्तव्याबाबत माफी मागावी, अशी मागणी भारतीय जनता पक्षाने केली आहे.तिरुमावलवन यांच्या या वक्तव्यामुळे जातीय तणाव वाढू शकतो.दरम्यान,आपल्या वक्तव्यावर टी. तिरूमावलवन यांनी स्पष्टीकरण दिले आहे. आपण केवळ मनुस्मृतीचा हवाला दिला होता. मनुस्मृतीवर बंदी घातली गेली पाहिजे. भारतीय जनता पक्ष जातीय तणावाला उत्तेजन देण्यासाठी खोट्या बातम्या पसरवत आहे, असे तिरूमावलवन यांनी म्हटले आहे. त्याचबरोबर टी. तिरूमावलवन यांच्यावर करण्यात आलेल्या कारवाई विरोधात डीएमके,( DMK) काँग्रेससह ( Congress) इतर विरोधी पक्षांनी विरोध दर्शवला आहे.