बहुजननामा ऑनलाईन – अंबानीच्या घराजवळ स्कार्पिओ गाडीत स्फोटक सापडल्याप्रकरणी NIA ने सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन वाझेंना अटक केली आहे. सध्या वाझेंची NIA कडून कसून चौकशी सुरु असून चौकशीत विविध खुलासे समोर येत आहेत. चौकशीत मनसुख हिरेन हत्या तसेच अनेक बनावट नंबर प्लेट आढळल्याचा तपास NIA करत आहे. NIA ने नुकतेच मुंबईच्या मिठी नदीतून संगणकाची हार्डडिस्क, DVR, CD आणि एका गाडीचे 2 नंबर प्लेट बाहेर काढले. या नंबर प्लेटवरून नवा खुलासा समोर आला आहे. चौकशीत ही नंबर प्लेट जालना येथे राहणा-या विजय नाडे यांच्या चोरी झालेल्या मारूती गाडीची असल्याचे समोर आले आहे. या कारचे वाझे कनेक्शन काय आहे, की तपास भरकटवण्यासाठी या गाडीचा उपयोग केला होता का? या प्रश्नांची उत्तरे NIA शोधत आहे.
NIA ने केलेल्या चौकशीत ही नंबर प्लेट राज्य शासनाच्या कल्याण विभागात काम करणाऱ्या क्लर्कच्या गाडीची आहे, जालना येथे राहणारे विजय नाडे यांची चोरी झालेल्या मारूती इको गाडीची ही नंबर प्लेट आहे, ही कार औरंगाबाद येथून चोरी झाली होती. याबाबत 20 नोव्हेंबर 2020 रोजी औरंगाबादच्या सिटी चौक पोलीसात तक्रार दाखल आहे. NIA सध्या तपास करत आहे की, या कारचे वाझे कनेक्शन काय याचा शोध घेत आहे. याबाबत विजय नाडे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, माझी कार 16 नोव्हेंबर 2020 रोजी चोरीला गेली आहे. याबाबत आपण सिटीचौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केल्याची माहिती त्यांनी दिली.