ठाणे : बहुजननामा ऑनलाईन – प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांच्या दक्षिण मुंबईतील अँटिलिया निवासस्थानासमोर सापडलेल्या संशयित स्कॉर्पिओ कारचा मालक मुंब्रा येथील रेतीबंदर या ठिकाणी काल शुक्रवार दि 5 मार्च रोजी मृतावस्थेत सापडला. मनसुख हिरेन (Mansukh Hiren) असं त्यांचं नाव आहे. या घटनेनंतर एकच खळबळ उडाली. त्यांच्या कुटुंबीयांनी याबाबत संशय व्यक्त केला होता. शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाल्यानंतरच मृतदेह ताब्यात घेऊ अशी भूमिका त्यांच्या कुटुंबीयांनी घेतली. अखेर ठाणे पोलिसाना त्यांचा शवविच्छेदन अहवाल मिळाला आहे.
काय सांगतो शवविच्छेदन अहवाल
मनसुख यांचं शवविच्छेदन ठाणे महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात करण्यात आलं. पोलिसांचा याचा अहवाल मिळाला आहे. हिरेन यांचा बुडून मृत्यू झाल्याचं या अहवालात नमूद करण्यात आलं आहे असं वृ्त्त एक वाहिनीनं दिलं आहे. त्यांचा व्हिसेरा पुढील तपासासाठी फॉरेन्सिक लॅबला पाठवण्यात आला येणार आहे. हिरेन यांचा शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर आता कुटुंबीय त्यांचा मृतदेह ताब्यात घेतील असंही पोलिसांनी सांगितलं आहे.
मनसुख हिरेन यांनी लिहिलं होतं मुख्यमंत्र्यांना पत्र
अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकांनी भरलेली गाडी मनसुख यांच्या मालकीची असल्यानं गेल्या काही दिवसांपासून त्यांची चौकशी सुरू होती. आपण पीडित असूनही एखाद्या आरोपीप्रमाणे वागणूक दिली जात आहे असा आरोप त्यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात करण्यात आला होता. हे पत्र त्यांनी मुख्यमंत्र्यांसह राज्याचे गृहमंत्री आणि मुंबई व ठाणे पोलीस आयुक्त यांनाही पाठवलं होतं. यात त्यांनी सूपूर्ण घटनाक्रमही सांगितला होता.