लखनऊ : वृत्तसंस्था – लॉकडाऊनमध्ये उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमध्ये एका माथेफिरू तरुणाने संपत्तीच्या वादातून त्याच्या घरातील सहा जणांची हत्या केल्याने खळबळ उडाली आहे. आरोपीने दोन लहान मुलांनाही निर्दयीपणे ठार करीत त्यांचे गळे कापून हत्या केली. हत्याकांडामुळे लखनऊ हादरले असून सामूहिक हत्याकाड बंथरा पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या गोदौली गावात झाले आहे.
गोदौली गावातील अजय नावाच्या तरुणाने धारधार शस्त्राचे वार करत आई – वडिल, भावासह त्याची बायको आणि दोन मुलांना ठार केले. सहा जणांची हत्या केल्यानंतर आरोपी तरुण स्वत:च पोलिस स्टेशनमध्ये पोहोचला आणि आत्मसमर्पण केले. पोलिसांसमोर तरुणाने हत्याकांडाची माहिती देताच खळबळ उडाली. पोलिसांनी आरोपी अजयला सोबत घेत घटनास्थळी धाव घेतली. तिथे रक्ताच्या थारोळ्यात पडलेले मृतदेह ताब्यात घेतले. त्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले.
प्राथमिक तपासात अशी माहिती समोर आली की, आरोपीच्या घरात संपत्तीचा वाद होता. यातच अजयला घरच्यांनी काही संपत्ती त्याच्या अपरोक्ष विकल्याची माहिती मिळाली. त्यानंतर चिडलेल्या अजयने सहा जणांची हत्या केली. सध्या आरोपीची चौकशी सुरू असून घटनेनंतर गावातील लोक भीतीच्या छायेखाली आहेत.
एनपीन्यूज24 नेटवर्क