नवी दिल्ली : वृत्त्तसंस्था – मागील सत्तर वर्षात काय केले असे पंतप्रधान नरेंद्र मोदी उठताबसता विचारत असतात, मात्र साठ वर्षांच्या देशाच्या विकासाच्या वाटचालीत तुम्हाला काँग्रेसच काँग्रेस दिसेल, तुम्ही पावणेपाच वर्षांत देश बरबादीकडे नेला अशा शब्दांत काँग्रेसचे गटनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर लोकसभेत चांगलीच टोलेबाजी केली.
राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावावर बोलताना खरगेंनी आकडेवारीनिशी मोदी सरकारची चांगलीच पोलखोल केली. जमिनीपासून अवकाशापर्यंत, पाण्यापासून अन्नापर्यंत सर्वच क्षेत्रांत काँग्रेसच्या राजवटीत देशाने उत्तुंग शिखर गाठले असे सांगत खरगेंनी 1947 मध्ये 17 टक्के असलेला साक्षरता दर 2014 पर्यंत आम्ही 74 टक्के केला. मृत्यू दर प्रतिहजारी 165 वरून 35 वर आमच्याच काळात आला. देशातील शेतकऱयांच्या जीवनाला क्रांतिकारी वळण देणारी हरित क्रांती आमच्याच काळात घडली याची आठवण खरगेंनी पंतप्रधानांना करून दिली. देशाच्या विकास दरात 33 पटींनी वाढ काँग्रेसच्याच काळात झाल्याचे सांगत खरगेंनी नोटाबंदी व जीएसटीसारखे निर्णय घेऊन मोदी सरकारने देशातील गोरगरीब जनतेला देशोधडीला लावल्याची जळजळीत टीकाही केली. काँग्रेसच्या कार्यकाळात झालेल्या योजनांची केवळ नावे बदलून चुकीची आकडेवारी जनतेपुढे फेकून सरकार विकासाच्या पोकळ गप्पा मारत आहे, मात्र राफेलविषयी सरकार गप्प आहे असा टोला त्यांनी लगावला. राफेलची संयुक्त संसदीय समितीमार्फत चौकशी करावी अशी मागणीही त्यांनी केली.
अंतरिम अर्थसंकल्पाच्या वेळी लोकप्रिय घोषणांचे गाजर अर्थमंत्री देशातील जनतेला दाखवत असताना मोदी मोदी नावाचा जयघोष सभागृहात झाला त्यावेळी स्वतः पंतप्रधान मोदीच आपला मेज वाजवत होते. ते इतके जोराने वाजवत होते की नंतर मी त्यांना भेटल्यावर विचारलेदेखील, ‘तुमचा हात दाखवा पाहू. मेज इतक्या जोरात वाजवल्याने हात दुखले तर नाही ना’ असा टोला खरगेंनी लगावताच सभागृहात मोठा हास्यकल्लोळ झाला.
आज केंद्रीय रस्ते विकासमंत्री नितीन गडकरींसाठी काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांनी जोरजोरात मेज वाजवले. लोकसभेत भारतमाला प्रकल्पासंदर्भात गडकरी प्रश्नाला उत्तर देत होते. माझ्याकडे येणाऱया खासदारांचे मी शक्यतो समाधान करण्याचा प्रयत्न करतो असे गडकरी म्हणाले. चार धाम एकत्र जोडण्याच्या प्रकल्पाचा धागा पकडत गडकरींनी ‘‘अध्यक्षमहोदय, आपणही गंगेला भेट द्यावी. प्रयागमधील गंगा किती शुद्ध आहे ते आपल्या लक्षात येईल’’ असे म्हटले. त्यावर सभापती सुमित्रा महाजन यांनी ‘‘गडकरीजी, तुम्ही खूपच चांगले काम करत आहात. माझा आशीर्वाद तुमच्या पाठीशी आहे’’ अशा शब्दांत गडकरींचे कौतुक केले. गडकरींचे उत्तर संपल्यानंतर मध्य प्रदेशातील भाजप खासदार गणेशसिंग यांनी नितीन गडकरी देशासाठी खूप चांगले काम करत आहेत. त्यामुळे त्यांच्याविषयी धन्यवाद प्रस्ताव सभागृहाने मंजूर करावा असा मुद्दा उपस्थित केला. त्यावेळी भाजप खासदारांनी जोरजोरात मेज वाजवायला सुरुवात केली. ते पाहून काँग्रेस नेत्या सोनिया गांधी, गटनेते मल्लिकार्जुन खरगे आणि जवळपास सर्वच विरोधी पक्षांच्या सदस्यांनी जोरजोरात मेज वाजवून गडकरींच्या कामाची पोचपावती दिली.