बहुजननामा ऑनलाईन : मालेगाव येथील सुरज पवार याने केंद्रीय लोकसेवा आयोगाकडून (यूपीएससी) घेण्यात आलेल्या केंद्रीय सशस्त्र पोलिस दल परीक्षेत घवघवीत यश संपादन केले आहे. परीक्षेत त्याने ३५२ वा क्रमांक मिळवला असून त्याची असिस्टंट कमांडटपदी निवड करण्यात आली आहे. त्याचे वडील सुभाष पवार हे देखील निवृत्त सैनिक आहेत . त्यामुळे देशसेवेचे बाळकडू त्याला लहानपणापासूनच मिळाले होते. आपल्या नियोजन बद्ध अभ्यासाने तसेच कठोर परिश्रमाने त्याने यश मिळविले आहे.
आजच्या बहुतांशी तरुणांचा कल हा यूपीएससी , एमपीएससी सारख्या नागरी सेवांकडे असतो. सूरज ने आपला वेगळा मार्ग निवडला. सूरज चे वडील हे निवृत्त सैनिक आहेत आणि आई गृहिणी आहे. सुरजचे शालेय शिक्षण भारत विद्यालय आणि केबीएच विद्यालयात झाले , तसेच महाविद्यालयीन शिक्षण मसगा महाविद्यालयातून झाले. त्या नंतर त्याने स्पर्धा परीक्षा देण्याचा निर्णय घेतला. २०१४ पासून तो प्रयत्न करत होता परंतु, त्याला अपयशच मिळत होते. त्याने न डगमगता पुन्हा तयारी केली . सुरुवातीला तो नागरी सेवा परीक्षेचा अभ्यास करत होता. नंतर त्याला केंद्रीय सशस्त्र पोलिस दल परीक्षेची माहिती मिळताच त्याने आपला कल तिकडे वळविला. त्याने तिन्ही टप्पे पार करत या परीक्षेत आपले यश संपादन केले. या परीक्षेत देशभरातून तब्बल तीन लाख जणांपैकी केवळ ४१६ जणांची निवड झाली आहे.
सुरज ने सांगितले कि, महाविद्यालयात असल्यापासूनच आव्हानात्मक क्षेत्रात जायचे निश्चित केले होते. इंग्रजीवर प्रभुत्व मिळविले. अभ्यासाचे नियोजन केले. आणि सुरुवात केली. दृशनिश्चय केला तर यश नक्कीच मिळते. देशाच्या आंतरिक सुरक्षेची संधी मिळाल्याने मोठा आनंद आहे. अभ्यासात मित्रांनी खूप सहकार्य केले.