बहुजननामा ऑनलाइन टीम – गुरुवारी मुंबईतील एनआयएच्या विशेष कोर्टाने मालेगाव स्फोट प्रकरणात (Malegaon blast case)सर्व आरोपींना पुढील तारखेला 19 डिसेंबर रोजी हजर राहण्याचे निर्देश दिले. एनआयए कोर्टाचे विशेष न्यायाधीश पी. आर. सित्रे यांनी भाजपचे खासदार प्रज्ञासिंह ठाकूर आणि लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित यांच्यासह सर्व आरोपींना गुरुवारी न्यायालयात हजर होण्याचे निर्देश दिले होते; पण प्रज्ञा ठाकूर, रमेश उपाध्याय, सुधाकर दिवेदी आणि सुधाकर चतुर्वेदी उपस्थित झाले नाहीत.
सुनावणीच्या वेळी फक्त तीन आरोपी न्यायाधीशांसमोर हजर झाले. इतर तीन आरोपींच्या वकिलांनी कोरोनाच्या प्रकृतीमुळे ते न्यायालयात हजर होऊ शकले नाहीत, अशी माहिती कोर्टाला दिली. त्यानंतर एनआयएच्या विशेष कोर्टाने सर्व आरोपींना 19 डिसेंबर रोजी हजर राहण्याचे निर्देश दिले. दरम्यान, मालेगाव स्फोट प्रकरणाच्या सुनावणीवर कोणतेही बंधन नसल्याचे गुरुवारी मुंबई उच्च न्यायालयाने स्पष्ट केले. कोर्टाने म्हटले आहे की, या खटल्याची सुनावणी सुरू ठेवली पाहिजे.
लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित यांच्या याचिकेवर सुनावणी घेताना मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती एस. एस. शिंदे आणि न्यायमूर्ती एम. एस. कर्णिक यांच्या खंडपीठाने हे निर्देश जारी केले. कर्नल पुरोहित यांच्या याचिकेद्वारे त्यांच्यावरील खटला रद्द करण्यात यावा अशी विनंती केली. पुरोहित यांच्या वकिलाच्या विनंतीवरील सुनावणीची पुढील तारीख कोर्टाने 14 डिसेंबर निश्चित केली. एनआयए कोर्टात कोणत्या टप्प्यावर सुनावणी सुरू आहे हे हायकोर्टालाही जाणून घ्यायचे होते. यावर एनआयएच्या वकिलाने सांगितले की, पुढची सुनावणी दररोज या खटल्याची सुनावणी होईल. आरोपींना हजर राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
दरम्यान, 29 सप्टेंबर 2008 रोजी महाराष्ट्रातील मुंबईपासून 200 किलोमीटर अंतरावर मालेगाव येथील मशिदीजवळ मोटारसायकलचा स्फोट झाला होता. या स्फोटात सहा जण ठार झाले, तर शंभरहून अधिक जखमी झाले. एनआयए या प्रकरणाचा तपास करत आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोटारसायकल प्रज्ञा ठाकूरच्या नावाने नोंदविण्यात आली होती आणि याच आधारावर 2008 मध्ये त्यांना अटक करण्यात आली होती. 2017 मध्ये मुंबई उच्च न्यायालयाने प्रज्ञा ठाकूर यांना जामीन मंजूर केला.