औरंगाबाद बहुजननामा ऑनलाईन – आगामी विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादीचे दिग्गज नेते आणि माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी निवडणुकीसाठीची तयारी सुरू केली असून यंदाच्या विधानसभा निवडणुकीत छगन भुजबळ हे आपला मतदारसंघ बदलण्याची शक्यता आहे. विधानसभेला आपल्या पारंपरिक मतदार संघातुन निवडणूक न लढवता औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर या मतदारसंघाची चाचपणी करत असल्याची चर्चा सुरु आहे.
औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर या मतदारसंघातुन भुजबळ यांनी लढावं यासाठी त्यांचे कार्यकर्तेही आग्रही असल्याचं पाहायला मिळत आहे. वैजापूर तालुक्यातील राष्ट्रवादीचे काही कार्यकर्ते लवकरच यासाठी भुजबळ यांची भेट घेणार आहेत. येवला मतदारसंघात निर्माण झालेले आव्हान लक्षात घेता छगन भुजबळ यांनी दुसऱ्या मतदारसंघातून निवडणूक लढवण्याचा विचार करत आहेत, अशी चर्चा जिल्ह्याच्या राजकारणात रंगत आहे. कारण या मतदारसंघात शिवसेनेकडून चांगली बांधणी करण्यात आली आहे.
दरम्यान, एकेकाळी नाशिक हा बालेकिल्ला असणारे राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ हे नाशिक सोडून इतर ठिकाणी का लढत आहेत याबाबत कोणतीही अधिकृत माहिती त्यांनी दिली नाही. पण तुरुंगात गेल्यानंतर त्यांचं कार्यकर्त्यांचं जाळं विस्तारलं. जामीन मिळाल्यानंतर त्यांनी आपलं वर्चस्व पुन्हा निर्माण करण्याचा प्रयत्न केला मात्र ते होऊ शकलं नाही. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत नाशिक मतदारसंघातून भुजबळ यांचे पुतणे समीर भुजबळ यांना दुसऱ्यांदा पराभव सहन करावा लागला. आता विधानसभेसाठी भुजबळ घराणे काय रणनीती आखणार हे बघावे लागेल.