Maharashtra Weather Update | मराठवाड्यात 72 तासांसाठी हवामान खात्याचा अलर्ट जारी; मुंबई, पालघर, ठाण्यातील स्थिती काय? जाणून घ्या

मुंबई : Maharashtra Weather Update | राज्याच्या काही भागात मान्सून जोर धरत आहे, मराठवाड्यात काही दिवसांपासून पाऊस पडत होता. पण आता मान्सून सक्रिय होण्याची चिन्हे दिसत आहेत. शनिवारी (५ जुलै) हवामान खात्याने छत्रपती संभाजीनगरसह ४ जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी केला आहे. हवामानात लक्षणीय बदल जाणवत आहेत. पुढील काही दिवस मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
आज छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी आणि हिंगोली येथे मुसळधार पावसाची शक्यता आहे. त्यामुळे हवामान खात्याने या ४ जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी केला आहे. ही परिस्थिती पुढील काही काळ कायम राहण्याची शक्यता आहे. या काळात ताशी ३० ते ४० किमी वेगाने वारे वाहतील. सोसाट्याच्या वाऱ्यांसह हलका ते मध्यम पाऊस पडेल, असा इशारा हवामान खात्याने दिला आहे.
मराठवाड्यातील उर्वरित ४ जिल्हे, बीड, नांदेड, लातूर आणि धाराशिव येथे हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच, एक-दोन ठिकाणी हलका पाऊस पडेल. ६ जुलैपासून लातूर आणि धाराशिव वगळता ६ जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. या काळात विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम पाऊस पडेल.
मराठवाड्यात पुढील ३ दिवस पाऊस पडणार आहे. हवामान खात्याने सोसाट्याच्या वाऱ्यांसह आणि विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा दिला आहे. या काळात छत्रपती संभाजीनगरसह ६ जिल्ह्यांमध्ये ७२ तासांसाठी पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तथापि, लातूर आणि धाराशिवमध्ये एक-दोन ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे.
दरम्यान, मराठवाड्यात मान्सून पुन्हा सक्रिय होण्यास सज्ज झाला आहे. दीर्घ प्रतीक्षेनंतर खरीप पेरणीच्या हंगामात आवश्यक पाऊस पडण्याची शक्यता आहे. हवामान खात्याने दिलेल्या इशाऱ्यानुसार, नागरिकांनी आणि शेतकऱ्यांनी खबरदारी घेणे आणि आवश्यक उपाययोजना करणे महत्त्वाचे आहे.
मुंबई-ठाण्यात मध्यम पाऊस :
दक्षिण-पश्चिम मान्सून पूर्ण सक्रिय झाल्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात पावसाचे आगमन झाले आहे. आज मुंबई महानगर, ठाणे, नवी मुंबई, पालघर आणि कोकण विभागात हवामान विभागाने हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा इशारा दिला आहे. नागरिकांना आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.