Maharashtra Politics | महायुतीचा महामंडळ पद फॉर्म्युला फायनल; आता नाराज आमदारांना लागणार लॉटरी?

मुंबई : Maharashtra Politics | सत्ताधारी महायुतीमध्ये निधी वाटपाबाबत अनेक तर्कवितर्क लावले जात असताना, दुसरीकडे तिन्ही पक्षांनी एका महत्त्वाच्या निर्णयावर एकमत केले आहे. राज्यातील महायुती सरकारमधील तिन्ही पक्षांनी महामंडळ वाटपाची प्रक्रिया अंतिम केली आहे आणि समन्वय समितीमध्ये यावर जवळजवळ एकमत झाले आहे. मंत्रिपदाच्या प्रतीक्षेत असलेल्या आणि नाराज आमदारांची नाराजी दूर करण्यासाठी त्यांना महामंडळ अध्यक्षपदाची ऑफर दिली जाणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे.
महानपालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुका लक्षात घेता, महायुतीतील नाराज आमदारांचा रोष वाढू नये म्हणून हे पाऊल उचलले जात असल्याचे बोलले जात आहे. शिवसेना (शिंदे गट), भाजप आणि राष्ट्रवादी (अजित पवार गट) या तिन्ही पक्षांतील नाराज आमदारांनी महामंडळ अध्यक्षपदासाठी लॉबिंग सुरू केले आहे.
मंत्री शंभूराज देसाई यांच्या निवासस्थानी महायुतीच्या समन्यवय समितीची बैठक झाली. बैठकीला शिवसेना शिंदे गटाकडून शंभूराजे देसाई, उदय सामंत, तर भाजपकडून चंद्रशेखर बावनकुळे आणि रवींद्र चव्हाण, राष्ट्रवादीकडून हसन मुश्रीफ आदींची उपस्थिती होती.
मुंबई आणि एमएमआर रिजनमधील प्रमुख महामंडळांच्या अध्यक्षपदासाठी मोठी रस्सीखेच सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली. मुंबई म्हाडा, सिडको, एमएमआरडीए, एमटीडीसी यासारख्या प्रभावशाली महामंडळांच्या अध्यक्षपदावर लक्ष केंद्रित केले आहे. यासाठी शिवसेना आणि भाजप आमदारांमध्ये तीव्र स्पर्धा सुरू आहे आणि पक्षांतर्गत गटबाजीही समोर येत आहे.
जास्तीत जास्त ४ ते ५ वेळा आमदार म्हणून निवडून आलेल्या ज्येष्ठ नेत्यांनाच अध्यक्षपदाची संधी दिली जाईल, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. अशा नेत्यांमध्ये मुंबई, ठाणे, पुणे आणि कोकणातील काही माजी मंत्र्यांची नावे चर्चेत आहेत. महामंडळ अध्यक्षपदाच्या निर्णयानंतर महायुतीतील तणाव काही प्रमाणात कमी होण्याची शक्यता आहे. तथापि, अंतिम यादीतून नवीन वाद निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.