मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – लोकसभा निवडणुकीच्या आधीपासून माजी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देणार अशी चर्चा सुरु होती. विखे-पाटील यांनी राजीनामा दिल्यानंतर प्रतिस्पर्धी बाळासाहेब थोरात यांची काँग्रेसच्या विधिमंडळ नेतेपदी निवड केली आहे. तर विजय वडेट्टीवार यांची विधानसभेच्या गटनेतेपदी निवड केली आहे.
नुकत्याच काँग्रेसचे सरचिटणीस के.सी. वेणूगोपाल यांनी या नियुक्त्या जाहीर केल्या आहेत. आमदार नसीम खान यांच्याकडे विधानसभा उपनेतेपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. बसवराज पाटील यांची मुख्य प्रतोदपदी तर के.सी. पाडवी, सुनील केदार, जयकुमार गोरे, यशोमती ठाकूर आणि प्रणिती शिंदे यांची विधानसभेच्या प्रतोदपदी नियुक्ती करण्यात आली आहे. विधान परिषदेच्या गटनेतेपदी शरद रणपिसे यांची तर उपनेतेपदी रामहरी रुपनवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. विधान परिषदेच्या प्रतोदपदी भाई जगताप यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
नगरच्या राजकारणात माजी विरोधीपक्ष नेते राधाकृष्ण विखे-पाटील आणि माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्यातील शीतयुद्ध हे सर्वांना परिचित आहे. नुकतेच राधाकृष्ण विखे-पाटील यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत सर्व पदांचा राजीनामा दिला होता. त्यातच विधानसभा जवळ आल्यामुळे बाळासाहेब थोरात यांच्यावर मोठी जबाबदारी सोपवली आहे.