मुंबई : बहुजननामा ऑनलाइन – राज्यातील सत्तासंघर्षात महाविकासआघाडीच्या चर्चा सुरू असतानाच रात्रीतून राष्ट्रवादीचे नेते अजित पवारांनी भाजपासोबत जात उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. अजित पवार यांनी पक्षात फूट पडत राष्ट्रवादीच्या १३ आमदारांच्या पाठिंब्याचा पात्र राज्यपालांना दाखविले. परंतु त्यातील बहुतांश आमदार राष्ट्रवादीत पुन्हा परतले आहेत. मात्र कालपासून बेपत्ता झालेले राष्ट्रवादीचे आमदार दौलत दरोडा यांनी व्हिडीओ प्रसिद्ध केला आहे. ज्यामध्ये आपण सुरक्षित आहोत असे सांगितले. मात्र या व्हिडीओच्या माध्यमातून जाहीर केलेल्या भूमिकेमुळे संभ्रम वाढला आहे.
शहापूरचे आमदार दौलत दरोडांनी थोड्या वेळापूर्वीच एक व्हिडीओ प्रसिद्ध केला. ‘मतदारसंघातील सर्व राष्ट्रवादीचे कार्यकर्ते, माझ्यावर प्रेम करणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांना विनंती आहे की, मी अतिशय सुरक्षित आहे. राष्ट्रवादीच्या घड्याळ निशाणीवर निवडून आल्याने पक्ष सोडण्याचा प्रश्न येत नाही. मी माननीय अजितदादा आणि माननीय शरद पवारसाहेब जो निर्णय घेतील, त्या निर्णयाला मी बांधील आहे. कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका, अशी माझी विनंती आहे,’ असं दरोडा यांनी म्हटलं आहे.
मात्र दरोडा यांच्या भूमिकेमुळे संभ्रम निर्माण झाला आहे. अजित पवार यांच्या भाजपासोबत जाण्याची भूमिकेवर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी नाराजी व्यक्त केली आहे. असेच राज्यात महाविकासआघाडीचं सरकार येईल, असा विश्वास व्यक्त केला आहे.