बहुजननामा ऑनलाइन टीम : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी 28 नोहेंबरला महाराष्ट्राचे 29 मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. त्याचबरोबर शिवसेना कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीच्या इतर सहा नेत्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. मात्र, पहिल्यांदाच झालेल्या या एतिहासिक आघाडीत मंत्रिपदांवरुन अनेक दिवस तिढा निर्माण झाला होता. त्यामुळे खातेवाटप रखडले होते. गृह खात्यावर शिवसेना आणि राष्ट्रवादीने दावा सांगितला होता. मात्र, बुधवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि अजित पवार यांच्यात झालेल्या चर्चेअंती खाते वाटपावर सहमती झाली. त्यानुसार शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांच्याकडे गृह आणि नगरविकास हे दोन्ही खाती सध्या देण्यात येणार आहे.
एकनाथ शिंदे यांच्याकडे नगरविकास हे खाते कायम असेल. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर हे खाते देऊन स्वतःपेक्षा जास्त विश्वास टाकला आहे. शिवाय नगरविकास हे खाते मुख्यमंत्री व्यतिरिक्त अन्य मंत्र्याकडे देण्याचा नवा पायंडा ही त्यांनी पाडला आहे. आजपर्यंत सर्व मुख्यमंत्र्यांनी नगरविकास खाते स्वतःकडे ठेवले होते.
विलासराव देशमुख, अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, देवेंद्र फडणवीस हे चारही मुख्यमंत्री त्याला अपवाद नव्हते. मात्र, मुख्यमंत्री ठाकरे यांनी हे खाते एकनाथ शिंदे यांना देऊन एक वेगळा पायंडा सुरु केला आहे. त्याचबरोबर आपल्या सहकारी नेत्यावर मोठा विश्वासही टाकला आहे. शिवसेनेत एकनाथ शिंदे यांना मानणारा आमदारांचा मोठा वर्ग आहे. ठाण्यात शिंदे यांनी स्वतःची मोठी ताकद उभी केली आहे. शिवसेनेमध्ये उद्धव ठाकरे यांच्या नंतर तेच सगळ्यात मोठे नेते आहे. त्या पार्श्वभूमीवर त्यांना हे खाते मिळाल्यामुळे शिवसेनेत शिंदे यांचे वजन वाढणार आहे.
संभाव्य खातेवाटप
राष्ट्रवादी : गृह, सहकार, वित्त, ग्रामविकास, पणन, सामाजिक न्याय, गृहनिर्माण, कृषी, सार्वजनिक आरोग्य. जलसंपदा, अल्पसंख्यांक
शिवसेना : नगरविकास, उद्योग, उच्च व तंत्रशिक्षण, परिवहन, एमएसआरडीसी, विधी व न्याय, माहिती व जनसंपर्क, वन, पर्यावरण, सांस्कृतिक कार्य, पाणीपुरवठा, अन्न व औषधी पुरवठा, पर्यटन
काँग्रेस : महसूल, ऊर्जा, आदिवासी विकास, सार्वजनिक बांधकाम, दुग्धविकास व पशुसंवर्धन, महिला व बालकल्याण, वस्त्रोद्योग, वैद्यकीय शिक्षण, शालेय शिक्षण. तसेच (राज्यमंत्री) सहकार, नगरविकास, गृह (ग्रामीण)
Visit : bahujannama.com