मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – राज्यातील विधानसभेचा निकाल लागून जवळपास २० दिवस झाले तरी आद्यपही राज्यात सत्ता स्थापन झाली नाही. बहुमत मिळूनही शिवसेनेच्या हट्टामुळे भाजपला सत्तेपासून दूर राहावं लागलं आहे. त्यामुळे आता राज्यात नव्या घडामोडींना उधाण आलं आहे. वेगळ्या विचारधारा असणारे शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस हे विरोधी पक्ष एकत्र येण्याच्या तयारीत आहेत. अशातच मुख्यमंत्रिपदासाठी चार नेत्यांची नावं चर्चेत आहेत.
विधानसभा निवडणुकीत दुसऱ्या क्रमांकाच्या जागा मिळवलेल्या शिवसेनेने जर काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत मिळून सत्तास्थापन केले तब्बल २० वर्षांनंतर शिवसेनेचा मुख्यमंत्री बनणार आहे. मुख्यमंत्रिपदासाठी शिवसेनेतूनच तीन तर राष्ट्रवादीकडून एका नेत्याचं नाव चर्चेत आहेत.
१. उद्धव ठाकरे
राज्यात महाशिवआघाडीची सत्ता आल्यास मुख्यमंत्रिपदाच्या स्पर्धेत उद्धव ठाकरे यांचं नाव सर्वात पुढे असू शकतं. मी महाराष्ट्रात शिवसेनेचा मुख्यमंत्री बसवणारच, दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना दिलेलं हे वचन पूर्ण करण्याचा निर्धार उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे या स्पर्धेत त्यांच्याही नावाचा समावेश असल्याचं म्हंटल आहे.
२. एकनाथ शिंदे
एकनाथ शिंदे यांचे पक्षात चांगले वजन आहे, ठाणे जिल्ह्याच्या राजकारणावर पकड आहे. मागील युती सरकारमध्ये ते मंत्रीही होते. पक्षातील त्यांच्या कामाच्या अनुभवामुळेच शिवसेनेनं त्यांच्यावर विधीमंडळ गटनेतेपदाची जबाबदारी टाकली आहे. त्यामुळे मुख्यमंत्रिपदासाठी एकनाथ शिंदे यांचादेखील नाव आघाडीवर आहे.
३. आदित्य ठाकरे
आदित्य यांच्या पुढाकाराने ठाकरे घराण्यातील पहिली पिढी राजकारणात उतरली आहे. आदित्य हे वरळी विधानसभा मतदारसंघातून निवडून आले. विधानसभा निवडणुकीदरम्यान शिवसेनेकडून मुख्यमंत्रिपदासाठी आदित्य ठाकरे हे पहिले उमेदवार आहेत. शिवसेनेच्या अनेक नेत्यांनी याबाबत इच्छाही व्यक्त केली होती. परंतु नवख्या असणाऱ्या आदित्य ठाकरे यांच्या नावावर काँग्रेस आणि राष्ट्रवादीची सहमती होणार का, याबाबत संभ्रम आहे.
४. अजित पवार
विधानसभा निवडणुकीत शिवसेनेपाठोपाठ राष्ट्रवादीच्या जागा निवडणुकीत आल्या आहेत. शिवसेनेनं ५६ तर राष्ट्रवादीने ५४ जागांवर विजय मिळवला आहे. त्यामुळे राष्ट्रवादीकडून अडीच वर्षांच्या मुख्यमंत्रिपदावर दावा करण्यात येणार असल्याची शक्यता असून राष्ट्रवादीचे विधीमंडळ पक्षनेते असलेले अजित पवार यांचं नाव पक्षाकडून मुख्यमंत्रिपदासाठी समोर येऊ शकतं.
Visit : bahujannama.com