मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – राज्यातील विधानसभा निवडणुकांचे निकाल लागून तीन आठवड्यांचा कालावधी उलटला आहे. तरी सत्तास्थापनेचा तिढा अद्यापही सुटलेला नाही. सर्वच पक्षांना सत्तास्थापनेत अपयश आल्यानं अखेर राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली. राज्यात सध्या शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तिनही पक्षांनी सत्तास्थापनेच्या हालचाली सुरू केल्या असल्या तरी शिवसेना किंवा भाजपा यापैकी कोणत्याही पक्षाकडून युती तुटल्याची घोषणा करण्यात आली नाही. परंतु याबाबत बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मात्र टोला लगावला.
युतीचा पोपट मेलाय, परंतु हे जाहीर कोणी करावं हा प्रश्न शिल्लक असल्याचं ते म्हणाले.महाराष्ट्रावर हा जो राष्ट्रपती राजवटीचा वरवंटा फिरवला गेला आहे याची पटकथा जणू आधीच लिहून ठेवली होती. विधानसभा सहा महिन्यांसाठी स्थगित करून राज्यपालांनी प्रशासकीय सूत्रे राजभवनाकडे घेतली आहेत. आता सल्लागारांच्या मदतीने ते इतक्या मोठय़ा राज्याचा कारभार हाकतील. राज्यपाल हे अनेक वर्षे संघाचे स्वयंसेवक होते.
उत्तराखंड या पहाडी राज्याचे ते मुख्यमंत्री राहिले आहेत, पण महाराष्ट्र वेगळे राज्य आहे. आकाराने आणि इतिहासाने ते भव्य आहे. येथे वेडेवाकडे काही चालणार नाही. जे शिवसेनेच्या बाबतीत झाले तेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या बाबतीत घडले. राष्ट्रवादी काँग्रेसला सत्तास्थापनेसाठी रात्री साडेआठपर्यंतची मुदत दिली गेली होती, पण थोडा वेळ वाढवून दिला तर बरे होईल असे विचारताच ‘8.30’ सोडाच, पण भरदुपारीच राज्यपालांनी राष्ट्रपती राजवटीची शिफारस केली अशी टीका शिवसेनेने भाजपावर केली आहे.
Visit : bahujannama.com