मुंबई : बहुजननामा ऑनलाइन – राज्यात सत्तास्थापनेचा संघर्ष वाढतच चालला आहे. भाजपकडे जास्त जागा असूनदेखील स्पष्ट बहुमत नाही आणि दुसरीकडे शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडून बसलेली आहे. जोपर्यंत बहुमत हातात येत नाही तोपर्यंत भाजप सुद्धा सत्ता स्थापन करणार नसल्याची चर्चा आहे. अशातच प्रहार संघटनेचे आमदार बच्चू कडू यांनी शेतकऱ्यांना मोठी मदत जाहीर करावी अशी मागणी केली आहे.
सुधीर मुनगंटीवार हे देवेंद्र फडणवीस यांना शिवसैनिक म्हणून संबोधतात म्हणून फडणवीस यांनी शिवसेनेत प्रवेश करून मुख्यमंत्री व्हावे असे बच्चू कडू यांनी भाजपला सुचवले आहे. प्रहार संघटनेच्या दोनीही आमदारांनी शिवसेनेला पाठींबा दिलेला आहे आणि आम्ही तो शब्द पाळणार आहोत त्यामुळे शिवसेनेचा मुख्यमंत्री व्हावा ही आमची इच्छा आहे असे देखील बच्चू कडू म्हणाले. अमित शहा आणि भाजपने दिलेला शब्द पाळला पाहिजे त्यामुळे फडणवीस यांनी अधिक ताणू नये असा सल्ला देखील बच्चू कडू यांनी फडणवीस यांना दिला.
भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी फोन करावा आम्ही चर्चेसाठी तयार आहोत असे स्पष्ट मत उद्धव ठाकरे यांनी आमदारांच्या बैठकीनंतर व्यक्त केले होते. तसेच लोकसभेच्या निवडणुकीवेळी जे काही ठरलेलं आहे ते व्हावं एवढीच माझी इच्छा आहे असे देखील उद्धव ठाकरे म्हणाले.
Visit : bahujannama.com