बहुजननामा ऑनलाईन टीम – देशभरात कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी डॉक्टर, सामाजिक कार्यकर्ते आणि पोलीस अहोरात्र झटत आहेत. ड्युटीपलीकडे जाऊन लोकांची मदत करताना दिसत आहेत. कोरोना आपल्या घरात येऊ नये म्हणून या सर्वांनाच खूप जास्त काळजी घ्यावी लागत आहे. सातार्याच्या पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांच्या यशामागे आणि त्यांच्या कोरोनाविरुद्धच्या लढाईत त्यांच्या पाठीशी पती खंबीरपणे उभे आहेत.
पोलीस खात्यातील नोकरी आणि कोरोनाविरुद्धच्या लढाईत तेजस्वी सातपुते यांना मुलीपासून लांब राहावे लागत आहे. तेजस्वी यांना 6 वर्षांची मुलगी असून तिची संपूर्ण जबाबदारी सध्या पती किशोर यांच्याकडे आहे. लॉकडाऊन आणि कोरोनाविरुद्धच्या लढ्यात कामाचा ताण तेजस्वी यांच्यावर जास्त आहे. काहीवेळी त्याचे जेवणही नीट होत नाही.
काम आटपून एकदा तेजस्वीनी घरी जेवणासाठी आल्या होत्या. त्यावेळी अचानक मिटिंगसाठी पुन्हा जावे लागल्यामुळे त्यांची आणि त्यांच्या मुलीची भेट होऊ शकली नाही. त्यामुळे त्यांची मुलगी रडत होती. तिने वडिलांकडे आईला रोज डबा द्या असा हट्ट धरला. वडिलांनी तिची समजूत घातली. या कोरोनाविरुद्धच्या लढाईत सातपुते कुटुंबायांनी स्वत:ला वाहून घेतले आहे. तर तेजस्वी यांचे पती किशोर त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत.