Maharashtra Congress On Badlapur School Girl Incident | बदलापूर प्रकरणी काँग्रेसचा मंत्रालयावर धडक मोर्चा; महायुती सरकारला वडेट्टीवारांनी घेरले, म्हणाले – “लाज वाटत नाही का? आंदोलन केले की राजकारण होते का?…”

मुंबई: Maharashtra Congress On Badlapur School Girl Incident | बदलापूर पूर्व येथील एका नामांकित शाळेत दोन चिमुकल्या मुलींवर झालेल्या लैंगिक अत्याचारानंतरराज्यात संताप व्यक्त केला जात आहे. या घटनेचा सर्वच स्तरातून निषेध व्यक्त केला जात आहे. या घटनेविरोधात काँग्रेसनेही आक्रमक भूमिका घेतली आहे. या अत्याचाराच्या निषेधार्थ काँग्रेसने मंत्रालयावर धडक मोर्चा काढला.
मात्र हा मोर्चा पोलिसांनी अडवल्यानंतर महात्मा गांधी पुतळ्याजवळ काँग्रेसच्या नेत्यांनी महायुती सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, मुंबई काँग्रेस अध्यक्षा खासदार वर्षा गायकवाड, आमदार अस्लम शेख, काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत, काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
महायुती सरकार एसआयटी सरकार आहे. कोणतीही घटना झाली की लगेच एसआयटीची घोषणा सरकारकडून केली जाते. परंतु कारवाई केली जात नाही. महायुतीची एसआयटी म्हणजे कारवाईचा फार्स आहे, अशा शब्दात विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी माध्यमांशी बोलताना महायुती सरकारवर टीकास्त्र डागले आहे.
त्याचबरोबर बदलापूर प्रकरणात एसआयटी नेमली तरी न्याय मिळेल का? असा संतप्त करत या प्रकरणी सरकारने उज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून नेमणूक केल्याने या नियुक्तीवर विजय वडेट्टीवार यांनी आक्षेप घेतला आहे.
वडेट्टीवार पुढे म्हणाले, बदलापूर येथील शिक्षण संस्था एका पक्षाशी संबंधित आहे. त्याच पक्षाच्या सबंधित वकिलाची विशेष वकील म्हणून नेमणूक केली आहे. या वकिलाने निवडणूक लढविली आहे. उद्या हे प्रकरण दाबले गेले तर त्याला जबाबदार कोण? याचे उत्तर सरकारला द्यावे लागेल.
सरकार म्हणते विरोधक राजकारण करत आहेत. तुम्हाला लाज वाटत नाही का सरकार म्हणून? कलकत्ता इथे अत्याचाराच्या घटना झाल्यावर भाजप आंदोलन करते तेव्हा राजकारण नसते का? आम्ही आंदोलन केले की राजकारण होते का? असे खडेबोलही वडेट्टीवार यांनी सुनावले आहेत.
Comments are closed.