थुथुकुडी (तामिळनाडू) बहुजननामा ऑनलाईन – आंतरजातीय विवाह केला म्हणून हत्या करण्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढतच चालले आहे आता असाच एक धक्कादायक प्रकार तामिळनाडूतील थुथुकुडी येथे घडला आहे.आंतरजातीय विवाह केला म्हणून एका जोडप्यांची हत्या करण्यात आल्याची घटनासमोर आली आहे. याप्रकरणी मुलीच्या घरच्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून विवाहित महिला तीन महिन्यांची गर्भवती होती.
अज्ञात लोकांकडून आंतरजातीय विवाह केला म्हणून रागातून या जोडप्याची हत्या करण्यात आली आहे. सोलीराजन (वय २४ वर्षे ) आणि ज्योती (वय २१ वर्षे ) असे या दाम्पत्याचे नाव आहे. हे दाम्पत्य वेगवेगळ्या जातीतील असल्यामुळे हत्या करण्यात आली आहे. सोलीराजन हा परायर समाजातील तर ज्योती ही पल्लार समुदायातील होती. हे दोघेही मीठाच्या कंपनीमध्ये कामाला होते. यादरम्यान दोघांमध्ये चांगली मैत्री झाली, कालांतराने या मैत्रिचे रुपांतर प्रेमात आणि नंतर प्रेमाचे रुपपांतर लग्नात झाले. यावेळी सोलीराजन यांच्या कुंटुंबाने लग्नाला मंजुरी दिली. मात्र ज्योतीच्या घरच्यांनी या लग्नाचा विरोध केला होता. यावर ज्योतीने एप्रिलमध्ये आपले घर सोडले आणि सोलीराजन सोबत लग्न केले.
या प्रकरणी थुथुकुडी पोलिसांनी मुलीच्या वडिलांना ताब्यात घेतले असून पुढील तपास पोलीस करत आहेत. ज्योतीचे वडील अलागर यांचा लग्नाला विरोध असल्याने हा प्रकार घडला असल्याचे सांगण्यात येत आहे. सोलीराजन आणि ज्योती यांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी थुथुकुडी येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयामध्ये पाठवण्यात आले आहेत.